सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर)
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून पळवून नेण्यात आलेल्या 5 अल्पवयिन मुला-मुलींचा आणि त्यांना पळवून नेणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यात अनैतिक वाहतूक प्रतिबंध कक्षाला यश आले आहे. या सर्वांना पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या स्वाधिन देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्जुन गरड यांनी दिली.
जुलै 2016 मध्ये तळोजा येथील पेंधर गावातून बेपत्ता झालेल्या 10 वर्षीय मुलाचा अनैतिक वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वतीने शोध सुरू असताना सदर अपहृत मुलगा कर्नाटकातील उडुपी येथील सुधारगृहात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अनैतिक वाहतूक प्रतिबंध कक्षाने कर्नाटकातील सुधारगृहात असलेल्या मुलाला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून ताब्यात घेऊन तळोजा येथील त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले. त्यानंतर एप्रिल 2020 महिन्यात तळोजा येथील 17 वर्षीय अल्पवयिन मुलीला अजय पांडे नामक तरूणाने तिला पळवून नेऊन तळोजा फेज-2 भागात ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अनैतिक वाहतूक प्रतिबंध कक्षाने अजय पांडे याच्या मोबाईल नंबरचा तांत्रिक तपास करून त्याला आणि त्याने पळवून नेलेल्या 17 वर्षीय अल्पवयिन मुलीला ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे खांदेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून रवी मोरे याने अल्पवयिन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची माहिती मिळाल्यानंतर अनैतिक वाहतूक प्रतिबंध कक्षाने याबाबत तांत्रिक तपास करून अपहृत मुलीस व पळवून नेणाऱ्या रवी मोरे याला ताब्यात घेतले आहे. तसेच कोपरखैरणे येथून पळवून नेलेल्या अल्पवयिन मुलीचा शोध घेत असताना सदर मुलगी मानखुर्द गाव येथील मंचुर ठाकूर याच्या घरात असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी सदर मुलीसह तिला पळवून नेणाऱ्या मंचुर ठाकूर याला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर खारघर भागातून बेपत्ता झालेल्या अल्पवयिन मुलीचादेखील अनैतिक वाहतूक प्रतिबंध कक्षाने तांत्रिक तपासद्वारे शोध घेऊन गुन्हा दाखल झाला त्याच त्याच दिवशी तिला पुण्यातील वाघोली परिसरातून ताब्यात घेतले आहे.






Be First to Comment