भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची मागणी
सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर)
छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या निवेदनात प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या अग्रीमा जोशूआ आणि सौरभ घोष यांच्यावर गुन्हे दाखल करणे तथा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागावी. स्वतःला स्टँडअप कॉमेडियन म्हणवणाऱ्या दोन निर्लज्ज व्यक्तींनी भारताचे आराध्य दैवत आणि भारतवासियांची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव कॉमेडी विषयात चुकीच्या पद्धतीने वापरून महाराजांचा आणि या देशाचा अपमान केला आहे. अग्रिमा जोषुवा व सौरभ घोष या दोघांनी आपल्या कॉमेडी कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख करून त्यांचे अरबी स्मारकातील उभारले जाणारे स्मारक तथा विमानतळाला दिले गेलेले महाराजांचे नाव याविषयी फारच असभ्य भाषेचा वापर करून महाराष्ट्रातील तमाम बांधवांच्या व युवांच्या भावनांचा अनादर केला आहे . या महाराष्ट्रातच उभे राहून, ज्यांच्यामुळे आपण स्वाभिमानाने उभे आहोत अश्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची हिम्मत कोणी करणार असेल तर अशा वृत्तींना वेळीच रोखणे अत्यावश्यक आहे. अन्यथा कायद्याला काहीच अर्थ उरणार नाही. उद्या कोणीही उठून महापुरुषांवर काहीही टीकाटिपणी करेल तर महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही . सदर विषयात महाराष्ट्रातील युवांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि म्हणून मी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने आपणाकडे मागणी करतो की अग्रिमा जोषुवा व सौरभ घोष या दोन्ही व्यक्तींवर त्वरित गुन्हे दाखल करावेत आणि त्यांनी “ छत्रपती शिवाजी महाराजांची ” व शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात युवा मोर्चाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.






Be First to Comment