सिटी बेल लाइव्ह |नागोठणे |याकुब सय्यद 🔷🔶🔶🔷
नागोठणे येथील रिलायन्स कंपनीच्या विरोधात विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी आंदोलन कर्त्यांकडून आपली मानहानी झाल्याची तक्रार रिलायन्स कंपनीचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांनी नागोठणे पोलिसांत केली आहे.
संघर्ष सामितीचे नेते राजेंद्र गायकवाड यांनी जे चिथावणीखोर भाषण केले त्यात त्यांनी आपल्याला “हरामखोर” असा अपमानकारक शब्द वापरला असल्याची तक्रार धनावडे यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रार अर्जात केली आहे. गायकवाड यांना या बाबत योग्य ती समज देण्यात यावी ,अशी मागणीही धनावडे यांनी तक्रार अर्जातून केली आहे.
रिलायन्स कंपनीच्या वतीने विभागातील शिहू येथील लिलाबाई निळकंठ पाटील यांचे शेतातून येथील रिलायन्स कंपनीच्या सांडपाणी वाहून नेण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. ही वाहिनी फुटल्यामुळे तिची दुरुस्ती करण्याचा कंपनीकडून प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पाटील यांनी या दुरुस्तीला हरकत घेत प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरी द्या व मगच दुरुस्ती करा ,असे सांगितले होते. रिलायन्सच्या एका अधिकाऱ्याने तक्रारदार महिला व त्याचा मुलगा रवींद्र यांना शेतावर बोलवून मुलासमोरच मला दमदाटी व शिवीगाळ केली. असे पाटील यांचे म्हणणे आहे.
या बाबत त्यांनी अधिकाऱ्याच्या विरोधात नागोठणे पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर रिलायन्स अधिकाऱ्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. याचा धनावडे यांनी तक्रार अर्जातून इन्कारही केलेला आहे.
या प्रकाराची शहानिशा करून घेण्यासाठी संबंधित महिलेला चर्चा करून मार्ग काढण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलवले होते. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसमवेत त्या महिलेच्या विरोधात अपशब्द काढलाच नव्हता असा खुलासाही धनावडेंनी केलेला आहे.
Be First to Comment