व्हीलन ठरला हिरो..
राहुल तेवातियाने ज्यावेळी फलंदाजीला सुरुवात केली त्यावेळी राजस्थानच्या चाहत्यांनी त्याला शिव्यांची लाखोली वाहिली. पण, जसजसा सामना शेवटाकडे गेला तसतसा हा सामन्याचा व्हिलन हिरो बनत गेला. त्याने कॉट्रेलने टाकलेल्या १७ व्या षटकात तब्बल ५ षटकार मारत फक्त आपला चेंडू आणि धावांचा बॅकलॉक भरुन काढला नाही तर राजस्थानला सामन्यातही परत आणले. त्यानंतर जोफ्रा आर्चरने दोन षटकार मारत राजस्थानच्या विजयाची औपचारिक्ता बाकी ठेवली. ती औपचारिक्ता टॉम कुरेनने विजयी चौकार मारत पूर्ण केली. या संपूर्ण क्लायमॅक्समध्ये संजू सॅमसनच्या ८५ धावांचे योगदानही विसरुन चालणार नाही.
तसेच कर्णधार स्मिथचेही ५० धावांचे योगदान बहुमूल्य ठरले. त्यांच्या या रचलेल्या पायामुळेच राजस्थानने पंजाबचे २२४ धावांचे मोठे टार्गेट ३ चेंडू राखून पार केले. राजस्थानने पंजाबचे हे २२४ धावांचे आव्हान पार केले, हा आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा धावांचा यशस्वी पाठलाग ठरला. राजस्थानने त्यांचाच २१५ धावांचा विक्रम आज मोडीत काढला.
किंग्ज इलेव्हन पंजाबने ठेवलेल्या २२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सनेही दमदार फलंदाजीचा नुमना पेश करत पंजाबचे टेन्शन वाढवले. यंदाच्या हंगामातील पहिला सामना खेळणारा जोस बटलर ४ धावांवर माघारी गेला. पण, त्यानंतर आलेल्या संजू सॅमसनने षटकारानेच सुरुवात करत आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर सलामीला आलेला कर्णधार स्टीव्ह स्मिथ रंगात आला. त्यानेही चौफेर फटकेबाजी करत पॉवर प्लेचा फायदा उचलण्यास सुरुवात केली. या दोघांनी यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या सामन्यातील पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा याच सामन्यात पंजबने केलेला विक्रम मोडीत काढत ६ षटकात तब्बल ६९ धावा ठोकल्या. पंजाबने त्यांच्या पॉवर प्लेमध्ये ६० धावा केल्या होत्या.
स्मिथ आणि सॅमसनने हा धडाका पॉवर प्लेनंतरही कायम राखत ९ व्या षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले. याचबरोबर स्मिथने २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण, या अर्धशतकानंतर स्मिथ निशेमच्या गोलंदाजीवर बाद झाला. २२४ धावा चेस करणाऱ्या राजस्थानसाठी हा मोठा धक्का होता. त्यानंतर राजस्थानच्या धावगतीला ब्रेक लावण्यात किंग्ज इलेव्हन पंजाबला संधी मिळाली. दरम्यान, संजू सॅमसनने आपले अर्धशतक २७ चेंडूत पार केले. पण, दुसऱ्या बाजूने राहुल तेवातियाने जास्त चेंडू डॉट घालवल्याने पंजाबची धावगती धिमी पडली. त्यानतंर सॅमसनने मॅक्सवेलच्या गोलंदाजीसमोर स्ट्राईक आपल्याकडेच ठेवण्याची रणनिती अवलंबत एकाच षटकात तीन षटकार ठोकत धावगती पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न केला. पण, पुढच्याच १७ व्या षटकात शामीने ४२ चेंडूत ८५ धावा करणाऱ्या सॅमसनला बाद केले. सॅमसननेही अग्रवाल प्रमाणेच ८५ धावांच्या खेळीत ७ षटकारांची आतषबाजी केली.
अखेर सॅमसन बाद झाल्यानंतर का असेना पण, तेवातिया तापला त्याने १८ वे षटक टाकणाऱ्या कॉट्रेलला चार चेंडूवर चार षटकार मारत मागचा सर्व बॅकलॉक भरून काढला. त्याने षटकाच्या सहाव्या चेंडूवरही षटकार मारून ३० धावा वसूल करुन घेतल्या. यामुळे राजस्थानला विजयासाठी १२ चेंडूत २१ धावांची गरज होती. पण, १९ वे षटक टाकणाऱ्या शामीने रॉबिन उथाप्पाला बाद करुन राजस्थानला चौथा धक्का दिला. उथाप्पानंतर आलेल्या जोफ्रा आर्चरने सलग दोन षटकार मारत सामना ९ चेंडूत ९ धावा असा आवाक्यात आणला. त्यानंतर अजून एक षटकार मारत विजय सोपा केला. अखेरच्या षटकात मुरगन अश्विनने विकेट मिळवत पंजाबसाठी थोडी उत्सुकता निर्माण केली. पण, टॉम कुरेनने विजयी चौकार मारत संजू सॅमसन, स्मिथ आणि तेवातिया यांच्या कष्टाला विजयी फळ मिळवून दिले.


तत्पूर्वी, किंग्ज इलेव्हन पंजाबने त्यांना प्रथम फलंदाजीला पाचारण करणाऱ्या राजस्थान रॉयल्सची पॉवर प्लेमध्ये चांगलीच धुलाई केली. या धुलाईत गेल्या सामन्यात शतकी तडाखा देणारा कर्णधार केएल राहुल नाही तर मयांक अग्रवाल आघाडीवर होता. या दोघांनी ५ व्या षटकातच संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. यात मयांकच्या १३ चेंडूत २७ धावांचे मोठे योगदान होते. दरम्यान, केएल राहुलनेही आपला आक्रमक अंदाज दाखवत पंजाबला ६ षटकात ६० धावांपर्यंत पोहचवले.
पॉवर प्लेनंतरही राहुल आणि अग्रवाल यांनी फटकेबाजी करणे सुरुच ठेवले. या दोघांच्या फटकेबाजीच्या स्पर्धेत अग्रवालने पहिल्यांदा बाजी मारत आपले अर्धशतक २६ चेंडूत पूर्ण केले. दरम्यान, पंजाबचे शतकही ९ व्या षटकात धावफलकावर लागले. ही यंदाच्या आयपीएलमधील पहिली शतकी सलामी ठरली. आतापर्यंत अग्रवालची फटकेबाजी दुसऱ्या बाजूने नुसताच बघत असलेल्या राहुनेही आपला गिअर बदलत आपले अर्धशतक ३५ चेंडूत पूर्ण केले. पण, तोपर्यंत संपूर्ण मैदानभर षटकारांची आतषबाजी करणारा मयांक अग्रवाल आपल्या शतकाच्या जवळ पोहचला होता. त्याने आपले शतक ४५ चेंडूत ठोकले. या शतकात त्याच्या ७ षटकार आणि ९ चौकारांचे मोठे योगदान राहिले.
केएल राहुल आणि मयांक अग्रवालने १८३ धावांची दमदार सलामी दिली. पण, त्यानंतर पहिल्यांदा मयांक १०६ धावांवर तर राहुल ६९ धावांवर बाद झाले. यानंतर निकोलस पूरन आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी पंजाबला २२३ धावांपर्यंत मजल मारून दिली. पूरनने ८ चेंडूत २५ धावांची छोटी पण आक्रमक खेळी केली. तर मॅक्सवेने ९ चेंडूत १३ धावा केल्या.
Be First to Comment