दोन तरुण मुद्देमालासह पाली पोलिसांच्या ताब्यात 🔷🔷🔶🔶
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔶🔶🔷🔷
सुधागड तालुक्यात कत्तलीसाठी अवैधरीत्या बैलाची वाहतूक करणाऱ्या व पोलिसांना चकवा देऊन पलायन करणाऱ्या त्या दोन तरुणांना अखेर पाली पोलिसांनी ताब्यात घेतले व कायदेशीर कारवाई केली. सुधागडात गुरे चोरीच्या वाढत्या घटना काही काळ थांबल्या होत्या, मात्र पुन्हा असे प्रकार समोर येत असल्याने गुरे मालक व शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.
या बाबत पाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रणय खंडागळे ( 25) रा. वऱ्हाड जांभूळपाडा (सुधागड) व आसिफ बेलेकर (वय 26) राहणार हाल (खालापूर) हे तरुण कुठून तरी चोरून आणलेला गावठी बैल त्यांच्या छोट्या टेम्पोतून अवैधरीत्या भरून सुधागड तालुक्यातील दहीगावकडून खोपोलीकडे वाहतूक करत होते. यावेळी एक तरुण हा टेम्पोतून जात होता तर दुसरा तरुण मोटारसायकलवरून जात होता. या तरुणांना दहिगाव फाटा येथे पोलिसांनी पकडले.
त्यानंतर या बैलाबाबत टेम्पो व मोटरसायकल चालकास पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी पोलिसांसोबत अरेरावीची भाषा वापरून धक्काबुक्की केली आणि न थांबता खोपोली बाजूकडे भरधाव वेगात निघून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून गोंदाव फाटा येथे त्यांना पुन्हा पकडले.
तरुणांकडे वाहतूक करत असलेल्या बैलाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, बैल मालकाची पावती, टेम्पोमध्ये बैलासाठी लागणारा चारा व पाणी तसेच बैल वाहतूक करण्याचा परवाना याची पोलिसांनी विचारणा केली असता ते नसल्याचे या तरुणांनी सांगितले. त्यावरून पोलिसांनी या दोन तरुणांनी संगनमत करून बैल चोरून आणून तो कत्तल करण्यासाठी घेऊन जात असतानाचे मिळून आले म्हणून त्यांना ताब्यात घेतले आहे.
पाली पोलिसांनी यावेळी केलेल्या कारवाईत एक बैल किंमत अंदाजे 10 हजार रुपये, महिंद्रा कंपनीचा एक मिनी टेम्पो अंदाजे किंमत 1 लाख व एक मोटारसायकल अंदाजे किंमत 30 हजार असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस जी म्हात्रे हे करत आहेत.








Be First to Comment