करोनाचे ३८४ नवे रुग्ण, मृतांची संख्या २०० पार , लॉक डाऊनने हातावर पोट असलेल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
महाराष्ट्रात आणि देशात जशी करोना बाधित रुग्णांची संख्या धक्कादायकरीत्या वाढत आहे , त्याचप्रकारे रायगड जिल्ह्यात देखील रुग्णसंख्येचा स्फोट होताना दिसत आहे. पूर्वी करोनाचा शहरी भागाला अधिक घट्ट विळखा होता, मात्र आजघडीला ग्रामीण भाग देखील करोनाची शिकार बनला आहे. रायगड जिल्ह्यात करोना बाधितांचा आकडा सात हजारांच्या पार गेला आहे. गेल्या २४ तासात करोनाचे ३८४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात २१४ जणांनी करोनावर मात केली आहे. अशातच लॉक डाऊन महिन्या महिन्याने वाढत असल्याने गोरगरीब सर्वसामान्य, श्रमजीवी, हातावर पोट असलेले मजूर, नागरिकांवर अक्षरश उपासमारीचे संकट ओढवले आहे. गडगंज संपत्ती असलेल्या लोकांना लॉक डाऊन कितीही वाढला तरी फरक पडत नाही, आम्ही गोरगरिबांनी खायचं काय? असा सवाल जन्मानसातून उपस्तीत होतोय.अशातच रुग्ण सापडलेली गावे, सोसायट्या, इमारती, विभाग कोरोना बाधित क्षेत्र म्हणून सील केले जात आहेत. त्यामुळे बाजारातून जीवनावश्यक साहित्य आणणे देखील कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांपुढे अनेक प्रश्न व अडचणी निर्माण झाल्या आहेत. सरकारने नागरिकांना अन्नधान्य पुरवावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जिल्हयात कोरोना अधिकच हातपाय पसरू लागला आहे. चिंतातजनक बाब म्हणजे दिवसभरात पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजवर दोनशेहून अधिक नागरिकांचा करोनाने बळी घेतला आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ००९ करोनाचे रुग्ण आहेत. तर आपल्या दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास व प्रतिकारशक्ती च्या जोरावर तब्बल ४ हजार ११८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आजघडीला एकूण रुग्णांची संख्या सात हजार पार झाल्याने प्रशासनापुढे मोठे आव्हान तर रायगडवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने सुरुच आहे. गेल्या चोवीस तासात तब्बल ३८४ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या ७ हजार ३३२ वर पोहोचली आहे. १२२ जणांचे तपास अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. तर करोनामुळे जिल्ह्यात दगावणाऱ्यांची संख्या आता २०५ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरवात झाली आहे. पनवेल, उरण या शहरी तालुक्यात रुग्णांच प्रमाण खुप जास्त आहे. अलिबाग, पेण, कर्जत, खालापूर आणि रोहा तालुक्यात रुग्णांची संख्या पण दिवसागणिक वाढते आहे. चिंताजनक बाब म्हणजे या तालुक्यांमध्ये शहरी भागांच्या तुलनेत ग्रामिण भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे. दिलासादायक बाब म्हणजे पाली सुधागड तालुका करोनामुक्त झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
जिल्ह्यात ३८४ नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. यात पनवेल मनपा हद्दीतील १६९, पनवेल ग्रामिण मधील ५४, उरण मधील ३०, खालापूर २८, कर्जत १५, पेण ३८, अलिबाग १८, मुरुड १२, तळा १, रोहा ६, श्रीवर्धन १, म्हसळा ०, महाड २ पोलादपूर १० रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पनवेल मनपा २, कर्जत १, अलिबाग १, मुरुड १ येथे एका रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात २१४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
जिल्ह्यातील २५ हजार ८१६ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ००९ करोना बाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील १३६४, पनवेल ग्रामिण हद्दीतील ४०९ उरण मधील १७६, खालापूर २२५, कर्जत ९४, पेण २४२, अलिबाग १८१, मुरुड ४८, माणगाव ५४, तळा येथील ४, रोहा ७५, सुधागड ०, श्रीवर्धन ४१, म्हसळा ४४, महाड ३९, पोलादपूर मधील १३ करोना बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्के ५६ टक्के आहे. तर रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३ टक्के टक्के आहे. दरम्यान रायगडवासीयांनी काळजी करू नये, काळजी घ्यावी, तसेच प्रशासनाचे नियम व सूचनांचे पालन करावे, करोनाचे युद्ध जिंकण्यासाठी प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करावे असे आवाहन रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जनतेला केले आहे.






Be First to Comment