Press "Enter" to skip to content

युसुफ मेहेरअली सेंटरचे प्रकल्प संचालक मतीन दिवाण यांचे निधन

सिटी बेल लाइव्ह / उरण (सुभाष कडू) 🔶🔷🔷🔶

युसुफ मेहेरअली सेंटरच्या वाटचालीत मागील पन्नास वर्षे सहभाग असलेले सेंटरचे प्रकल्प संचालक , उपाध्यक्ष व आपटा येथिल शाळेचे संस्थापक श्री मतीन दिवाण यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले.

कोरोनाच्या महामारी मध्ये तारा व जवळच्या २०-२५ गावांमध्ये जावून गरजू गरीबांना मदत करण्यासाठी मतीन दिवाण यांनी एका योध्यासारखे काम केले. स्थलांतरीत लोकांची सेवा केली , सहाय्य केले. हृदयाची शस्त्रक्रिया होऊन पेस मेकर बसवलेला असताना सुध्दा सेंटरच्या कामात सातत्याने कार्यरत राहाणे हे ते कर्तव्य समजत होते . अखंड काम करण्याची जिद्द असलेले मतीन दिवाण यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने सेंटरचे अपरिमित नुकसान झाले आहे. सेंटर म्हणजे मतीन व मतीन दिवाण म्हणजे सेंटर अशी ओळख झाली होती. त्यांच्या कर्तूत्वाचा हा मैलाचा दिपस्तंभ होता !

सेंटरने समाजवादी विचारांचे विधायक उपक्रम सुरू केले , प्रसंग आला तर संघर्ष केला मतीण दिवाण यांनी नेहमीच फ्रंटवर राहून नेतृत्व केले. त्यांचे उर्दू भाषेवर प्रेम होते. उर्दूनी दिलेली मोहब्बत आणि माणुसकी त्यांचा प्राण होती. आपटा येथे सहकारी जमा करून जागा मिळवली व उर्दू शाळा सुरू केली. पुढे तिचे असे संगोपन केले की आता आता ज्युनिअर काॕलेजच्या रूपाने वास्तू दिमाखदारपणे मुलांचे भविष्य घडवित आहे. सेंटरने सुरू केलेले ग्रामोद्दोग हा महात्मा गांधीजी व युसुफ मेहेरअली यांच्या विचारांचा पाया आहे हे संस्थेचे संस्थापक स्वातंत्र्य सेनानी डाॕ जी जी परिख यांनी तारा परिसरात बिंबवले , मतीन दिवाण यांनी हे मार्गदर्शन अंगिकारले आणि शेवटच्या श्वासापर्यंत अमलात आणले. डाॕ जी जी परिख व त्यांची गुरू शिष्य म्हणून ओळख संपुर्ण रायगड जिल्हा ओळखून होता.

स्वयंरोजगाराचा पाया तारा संकुलात निर्माण करण्यात त्यांचे योगदान हे मोठे होते. कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थितीशी सामना करीत असताना त्यांचे निधन सेंटर साठी मोठा आघात आहे. डाॕ जीजी परिख यांचा गुणी , कर्तबगार शिष्य व आमचा जीवाभावाचा सहकारी निघून गेल्याची हळहळ लागून राहीली आहे. केवळ सेंटरच नव्हे तर सर्व सामाजिक संघटना , संस्था यांच्याशी त्यांचे प्रेमाचे व सहकार्याचे संबंध होते . सामाजिकक बाधिलकी जपणार्‍या सर्व संस्थांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.