Press "Enter" to skip to content

सवयीची सवय

सवयीची सवय

परवा कमल हसनचा पुष्पक सिनेमा पहात होते. यात कमल हसन एका हॉटेलमध्ये दुसऱ्याच नावाने रहायला जातो. रात्री त्याला हॉटेलच्या निरव शांततेत झोप येत नाही. त्यावर उपाय म्हणजे तो ज्या चाळीतल्या एका खोलीत राहात असतो तिथले आवाज रेकॉर्ड करून आणतो. ते सवयीचे आवाज ऐकत ऐकत तो शांत झोपतो!!
माणूस कसा सवयीचा गुलाम असतो नाही!!
आपल्या घरात देखील आपली अशी जागा ठरलेली असते. अगदी डायनिंग टेबलाभोवती जेवायला बसताना देखील आपण सवयीने त्याच खुर्चीवर बसतो. अगदी चहा प्यायची किंवा वाचन करायची आपली घरातली जागा ठरलेली असते. त्यात बदल झाला की आपल्याला अस्वस्थ वाटते.
नीट विचार केला की जाणवते की सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत (खरेतर झोपेत सुद्धा!) आपण अनेक कृती केवळ सवयीने करत राहातो. आपले मन वेगळाच विचार करत असते आणि हात वेगळेच काम करत असतात. उदाहरणार्थ आपण उठल्या उठल्या सवयीने चादरीची घडी घालतो आणि ब्रश करायला जातो. यांत्रिकपणे पेस्ट ब्रशवर घेतो आणि दात ब्रश करतो. याचवेळी आपण मनातल्या मनात दिवसभर करायच्या कामांची उजळणी करतो. एकीकडे पाणी तापवण्यासठी गिझर सुरू करतो. ब्रश करताना आरशासमोर उभे असू तर आरसा चिकट झालाय. टिकल्यांची नक्षी जरा जास्तच मोठी झालेय किंवा काल गडबडीत बेसीन धुवायचे राहिले असे कितीतरी विचार करत असतो. अक्षरशः ब्रश करणे या क्रियेचा सोडून इतर अनेक गोष्टींचा ताबा मेंदूने घेतलेला असतो आणि आपले हात केवळ सवयीने ब्रश करायचे काम करतात!
दिवसभरात अगदी स्वैपाक, गाडी चालवणे यापासून आपले अॉफीसातले रोजचे काम करणे यात आपले मन, विचार एके ठिकाणी असतात आणि हात व इतर अवयव सवयीने आपापली कामे करत असतात. हा आहे सवयीचा परिणाम!!
यामुळे आपल्या कामाची प्रत आणि पोत दोन्ही हळूहळू घसरणीला लागतो! तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? आम्ही कित्येक वर्षांच्या सवयीने बरोबर स्वैपाक करतो. आतातर डोळे बंद करूनही पोळी लाटली तरी ती गोलच होईल.
यात कामाची प्रत तशीच असेल पण कामातून मिळणारा आनंद कुठे आहे?आठवा बरं आपण पहिल्यांदा गोल पोळ्या केल्या तेव्हा आपल्याला किती आनंद झाला होता. आता सवयीचे झाल्यावर तसा आनंद मिळत नाही.
आपल्या कामातही तोचतोचपणा आला की त्या कामाची सवय होते आणि मग त्यातला आनंद कमी होतो.

यावर उपाय काय?
वैज्ञानिक दृष्टिकोनातून काही उपाय असतीलही. मी यावर वैयक्तिक पातळीवर तोडगा काढला आहे.
एक म्हणजे अधूनमधून सवय बदलायची. म्हणजे आपण जर रोज घडीची पोळी करत असू तर अधूनमधून फुलका, पराठा किंवा दोन पडाची पोळी असे काहीसे वेगळे बनवायचे. असे केले तर आपल्याला एकाच पद्धतीची सवय लागत नाही.वेगळे केल्याचा आणि वेगळे खाण्याचा आनंद मिळतो.
सवयीचे गुलाम व्हायचे नाही. चहा प्यायला नाही तर डोकं दुखतं असे असेल तर एखाद दिवस मुद्दाम चहा ऐवजी कॉफी, दूध प्यायचे. याने होते काय की आपण कुठे गेले असू आणि आपल्या सवयीची एखादी वस्तू किंवा पदार्थ मिळाला नाही तरी त्यावाचून अडत नाही.
सवय आणि व्यसन यात एक पुसटशी सीमारेषा असते. ती ओळखता यायला हवी. आपण ती सीमारेषा पार तर करत नाही ना? याचा वस्तूनिष्ठ त्रयस्थतेने विचार केला गेला पाहिजे.
नाहीतर आपला तो बाब्या या उक्तीप्रमाणे आपली ती सवय आणि दुसऱ्याचे ते व्यसन!! असे होऊ शकते.
या सवयीची पण एक गंमत असते. वाईट सवयी पटकन लागतात आणि सुटता सुटत नाहीत. चांगल्या सवयी लागता लागत नाहीत आणि पटकन सुटतात!!
तमाम मानवजात तशी मुळात आळशी आणि खोलवर विचार न करणारी असावी. त्यामुळे क्षणिक आनंद देणाऱ्या व आळशीपणाला खतपाणी घालणाऱ्या सवयी पटकन लागतात आणि विशेष शारीरिक वा मानसिक मेहनत लागणाऱ्या सवयी आपल्याला लागता लागत नाहीत.

आणखी एक करायला शिकलो तर आपल्या कामाची प्रत आणि पोत नक्की सुधारेल आणि आपण त्या कामातून आनंद मिळवू शकू. ते म्हणजे मन लावून काम करणे. आपले शरीर जी काही क्रिया करत असेल त्यावर लक्ष एकाग्र करणे!!
लेखाच्या सुरुवातीला दिलेले दात ब्रश करण्याचे उदाहरणच परत घेऊया. (डेंटिस्टची नजर दातावर!!!) माझ्याकडे येणारे पेशंटना त्यांच्या दातावरचे साचलेले अन्नकण पूर्णपणे निघत नाहीत असे मी म्हणते तेव्हा त्यांना आश्चर्य वाटते. मी तर दोन वेळा दात ब्रश करते/करतो मग असा कसा कचरा राहील? हा अनेकजणांना प्रश्न असतो. तेव्हा त्यांना मी नेहमी एकच उत्तर देते. तुमचे हात सवयीने ब्रश करतात पण तुमचे मन त्या ब्रश करण्यात नसते म्हणून तुम्ही दोनवेळा ब्रश केले तरी दात हवे तसे स्वच्छ होत नाहीत.
आपल्या लहानपणापासून आपल्याला सतत सांगितले जाते की प्रत्येक काम मन लावून करायला हवे. ते का हे मोठे झाल्यावर अनुभवांती कळते.

कलाकाराच्या बाबतीत तर कला पेश करणे सवयीचे होणे फारच घातक! कलाकारातली सृजनशीलताच नाहीशी होईल अशाने. म्हणूनच बहुतेक कलाकार एकाच पठडीतल्या भूमिका करायचे टाळतात. काही कलाकार पठडीतल्या भूमिका देखील मन लावून अशा प्रकारे करतात की त्यात तोचतोचपणा वाटणार नाही.

तात्पर्य काय तर सवयीने सवयीचा गुलाम न होता आपण प्रत्येक काम मन लावून करायची सवय करूया!!!

समिधा गांधी, पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.