सिटी बेल लाइव्ह / उरण (घनःश्याम कडू) : 🔷🔶🔷🔶
राज्यात कोरोनाने हाः हाः कार माजवला आहे. त्यामुळे काहींवर बंदी तर काहींना नियमांच्या काचोरीत परवानगी दिली आहे. मात्र उरणमध्ये या सर्व नियमांची पायमल्ली करून व्यवसाय सुरू आहेत.
यामध्ये प्रामुख्याने दारू व गुटख्याचा समावेश आहे. काही बारवर व गुटखा विक्रेत्यांवर कारवाई होऊनही आजही ते नियमांचा भंग करीत असल्याचे चित्र पहावयास मिळते. याबाबत येथील उत्पादनशुल्क अधिकार्यांच्या निदर्शनास आणूनही ते उलट नियमांचे पालन होत असल्याचे सांगतात. तरी उत्पादनशुल्कच्या वरीष्ठ अधिकारी वर्गानी अचानक फेरी मारली तर याचा नक्कीच भांडाफोड होऊन दारू विक्रेते व अधिकारी वर्गाचे साटेलोट उघड होईल अशी चर्चा उरणच्या जनतेत सुरू आहे.
कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी शासनाकडून काही व्यवसायांना नियमांचे बंधन घालून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने रेस्टॉरंट, बार, वाईनशॉप व बियरशॉप यांचा समावेश आहे. सदर व्यवसायांना नियमांचे बंधन असतानाही उरणमधील बार, वाईनशॉप व बियरशॉपी यांच्याकडून नियमांचे उघडपणे उल्लंघन केले जात आहे.
काही दिवसापूर्वी उरणमधील सह्याद्री रेस्टॉरंट व बारमध्ये बसून दारू पिण्यास परवानगी दिल्याबद्दल मालक अशोक शेट्टीवर उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा कारवाईला न घाबरता
आजही त्यांच्याकडून नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळते. रात्री दारू विक्रीस बंदी असतानाही बार मध्यरात्री पर्यंत तर वाईनशॉप रात्री 9 वाजेपर्यंत सुरू असल्याचे ग्राहक व शेजारील रहिवासी सांगतात.
तसेच वाईनशॉपमधून मोठ्या प्रमाणात ओरिजनल पेक्षा बनावट दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. वाईनशॉपमधून पहाटेच्या सुमारास टेंम्पो व रिक्षातून तालुक्यातील गावोगावी दारू पोहचविले जाते. त्यामुळे उरणमधील गावागावात पाहीजे ती दारू विनापरवाना विकली जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दररोज उरणमधून लाखो रुपयांच्या दारूची विक्री होते. त्यामध्ये बनावट दारूचा साठा जास्त असतो अशी माहिती गावोगावचे विक्रेते व दारूचा आस्वाद घेणारे सांगतात. याबाबत गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याच्या तक्रारी येथील अधिकारी वर्गाकडे केल्या आहेत. तसेच याबाबत वृत्तपत्रात याबाबत अनेकवेळा वृत्त प्रसिद्ध होऊनही कारवाई करण्याचे नाव तर घेत नाही उलट त्यांच्याबरोबर उठबस असते. कारण आम्ही अधिकारी वर्गाचा मानसन्मान करीत असल्यामुळे ते कारवाई करू शकत नसल्याची दरपोक्ती बार, वाईनशॉपवाले करीत आहेत.
रेसिडेंस्लमध्ये बार व बियरशॉपीला परवानगी नसतानाही ते सुरू आहेत. काही रेस्टॉरंट व बार मालकांनी नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून संडासच्या टाकीवर किचनरुम बनवून ग्राहकांच्या जीवाशी खेळत आहेत. उरण नगरपालिकेला सर्वसामान्यांचे अतिक्रमण दिसते मात्र अशाप्रकारे लोकांच्या जीवाशी खेळणारे कित्येक वर्षांपासूनचे अतिक्रमण दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगरपालिकेचे काही वरिष्ठ अधिकारी वर्ग काही बारमधील अतिक्रमण भागातच मद्याचा आस्वाद घेत असतात त्यामुळे कारवाई प्रश्नच येत नाही अशी चर्चा उरणच्या नाक्यानाक्यावर सुरू आहे.
याप्रकरणी उरणमधील काही सामाजिक संघटना वरिष्ठ अधिकारी व उत्पादनशुल्कमंत्री यांच्याकडे फोटोग्राफ व शूटिंग काढून लेखी तक्रार करणार असल्याचे समजते. यामुळे बार, वाईनशॉप व बियरशॉपी व अधिकारी वर्गाचे धाबे दणाणले आहे.
Be First to Comment