Press "Enter" to skip to content

सावधान गुरे ढोरे चोरणारी टोळी रात्रीच्या अंधारात फिरतेय !!


दक्ष नागरिकांमुळे बोरी नाक्यावर आलेली तवेरा पळाली ! करंजात गाईला गुंगी !!

सिटी बेल लाइव्ह / उरण ( अजित पाटील )

गुरे – ढोरे चोरणाऱ्या टोळीच्या तवेरा गाडीने उरण तालुक्यात मागील काही दिवस धुमाकूळ घातला असून रात्रीच्या अंधारात ही टोळी तवेरा गाडी घेऊन परिसरात फिरत असते. अशाच प्रकारे बोरी नाका येथे भर रस्त्यावर गाडी उभी करून त्यात पांढऱ्या रंगाच्या गाईला पाठीमागच्या बाजूस कोंबत असताना एका दक्ष नागरिकांनी त्यांना घरातूनच शिव्यांची लाखोली वाहिल्याने ही गाडी पळून गेल्याची घटना घडली असून उरण तालुक्यातल्या विविध सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा आहे . याबाबत उरण पोलिसांनी मात्र कोणतीही माहिती अधिकृतपणे दिलेली नाही मात्र सोशल मीडियावर याबाबत जो व्हिडियो व्हायरल झाला आहे त्यातून तो विभाग उरणच्या उरण मोरा रस्त्यावरील बोरी नाका येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे अशाच प्रकारे एक तवेरा गाडी मागील आठवड्यातच करंजा परिसरात येऊन गेल्याची वंदता असून या गाडीतील गुरे चोरणाऱ्या हरामी लोकांकडून गुरांना इंजेक्शन्स मारून गुंगी दिली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अशाच प्रकारे गुंगी आलेली एक गाय कारंजा येथील रस्त्यावर पडली होते असे आढळून आल्याची चर्चा आहे. या दोन्ही प्रकारांमुळे उरण तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही वर्षांपूर्वी ही अशाच प्रकाराची गुरे ढोरे चोरणाऱ्यांनी या भागात अगदी दहशत माजवली होती. त्यावेळी नागरिकांनी पाळती ठेवून संबंधितांना हुसकावले होते त्यामुळे काही महिने बंद असलेला हा प्रकार आता पुन्हा उफाळून आला असून गुरे चोरण्यासाठी येणाऱ्या या तवेरा गाडीला आणि त्यातील हरामी लोकांना पोलीस यंत्रणा पकडणार का असा सवाल या ठिकाणी विचारला जात आहे.
प्रशासकीय यंत्रणा सध्या कोरोना महामारीच्या निमित्ताने व्यस्त आहे . यात पोलिसांवरही कामाचा मोठा ताण आहे त्यातच नागरिकही या जागतिक महामारीच्या तणावात असल्याने फारसे जागे राहणे वैगरे गोष्टी घडत नाहीत. याचाच फायदा उचलत एक गुरे – ढोरे चोरणारी टोळी उरण तालुक्यात रात्रीच्या अंधारात तवेरा गाडी घेऊन फिरत असल्याची माहिती समोर आली आहे . या गाडीच्या पाठीमागच्या सीट्स काढलेल्या असून त्यात गुंगी दिलेल्या दोन गाई किंवा बैल आरामात बसतील अशी व्यवस्था असलेली गाडी घेऊन हे चोर येत असल्याची वंदता आहे. रात्री सुमारे एक दीडच्या सुमारास ही गाडी आणि चोर येत असूंन ते रस्त्यावर बसणारी गुरे ढोरे यांना गुंगीचे इंजेक्शन देऊन चोरून घेऊन जात असल्याबाबत भीतीयुक्त चर्चा उरणमध्ये चर्चिली जात आहे. हे गुरे ढोरे चोर हत्यारबंद असल्याचा संशय असल्याने कोणीही सामान्य नागरिक यांना थेट आडवा जाण्याचे धाडस दाखवत नाहीत. काही वर्षांपूर्वी तर विंधणे येथील रस्त्यावर अशीच एक गाडी थांबवून तबेल्यात बांधला गेलेला घोडाच सोडून घेऊन जाण्याचा प्रयत्न अशाच अज्ञात चोरांच्या कडून झाला होता मात्र मालकांनी जाग आल्याने आरडा ओरडा केला त्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला होता. मागील काही दिवस या चोरांनी उरण शहर आणि परिसरात धिंगाणा घालणे सुरू केले असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी उरणच्या बोरी नाक्यावर आलेल्या अशाच प्रकारच्या एका तवेरा गाडीत गाय भरीत असताना शेजारी असलेल्या ईमारतीतील नागरीकांनी त्यांना हटकत जोरदार शिवीगाळ करीत विरोध केल्याने ते गाडीसह पळून गेल्याचा एक व्हिडीओ सध्या उरणच्या अनेक सोशल मीडियावर गाजत आहे. यातील जे कुटूंब या चोरांना हटकत आहे ते घाडगे कुटूंब असल्याचे ही बोलले जात आहे मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.