कोव्हीड योध्यांची कोरोनाशी झुंज ठरली अपयशी : पालीत शोककळा 🔷🔶🔷🔶
डॉ. अपूर्व मुजुमदार यांच्या रूपाने खरा कोव्हिडं योद्धा हरपला, पालीत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली आदरांजली 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) 🔶🔶🔷🔷
जगावर आलेल्या कोविड 19 या आंतरराष्ट्रीय साथ रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामध्ये रुग्णांची अहोरात्र सेवा करणारे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक कर्मचारी, पोलीस,प्रशासकीय अधिकारी कर्मचारी,कोविड योद्धा प्राणास मुकत आहेत. पाली येथील रहिवाशी आणि व्यवसायाने डॉक्टर असलेले डॉ.अपूर्व चंद्रकांत मुजुमदार यांची रविवारी दि.(20)वयाच्या 62 व्या वर्षी दुःखद निधन झाले. कोरोनाशी त्यांची झुंज अपयशी ठरली. आणि एक सेवाभावी व बांधिलकी जपणारे, तसेच सदैव हसमुख व सुस्वभावी व्यक्तिमत्व अचानकपणे काळाच्या पडद्याआड गेल्याने पाली सुधागडात शोककळा पसरली आहे.
डॉ.मुजुमदार हे आपल्या व्यवसायाशी अत्यंत प्रामाणिक होते. आपल्या रुग्णाला योग्य व चांगली सेवा देण्याबरोबरच त्याला मानसिक आधार व धीर देत असत. त्यामुळे रुग्ण लवकर बरे होत असत. सुधागड वासीयांचे आरोग्य निरोगी व सदृढ राहावे यासाठी ते आपल्या दवाखान्यात शहरातील तज्ञ डॉक्टरांना बोलवून मार्गदर्शन घेत असत. पालीत रक्त तपासणी एक्सरे मशीन सर्व प्रथम त्यांच्याच दवाखान्यात सुरू झाली.
समाज सेवेचा वारसा त्यांच्या आई अहिल्याबाई होळकर पुरस्कार विजेत्या सुहासिनी मुजुमदार यांच्या कडून लाभला . डॉ. मुजुमदार अनेक शासकीय सामाजिक समित्यामध्ये कार्यरत होते. भोराई ट्रस्ट मध्ये देखील त्यांचा सहभाग होता. कोरोना काळात त्यांनी केलेल्या सेवाभावी कार्याची दखल घेत डॉ. मुजुमदार यांना कोविड यौद्धा हा पुरस्कार मिळाला होता. डॉ.अपूर्व मुजुमदार यांच्या रूपाने एक ज्येष्ठ, अनुभवी व आम्हा सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर हरपले असल्याची शोकाकुल भावना सुधागड तालुका डॉक्टर असो. चे सर्व पदाधिकारी व डॉक्टरांनी व्यक्त केली. डॉ.अपूर्व मुजुमदार यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायाला नेहमीच समाजसेवेचे व्रत मानले. मानवी सेवा हीच खरी ईश्वरी सेवा असल्याचे मानून त्यांनी जीवनभर काम केले. समाजाप्रती कायम बांधिलकी जपणारे व सर्वाना आवडणारे सेवाभावी डॉक्टर आपल्यातून आज निघून गेले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. अशी शोकाकुल प्रतिक्रिया राष्ट्रवादी चे ज्येष्ठ नेते वसंतराव ओसवाल यांनी दिली.
पाली सुधागडातील नागरिकांच्या आरोग्याची कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेणारे , निर्मळ स्वभावाचे अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपले, ते आज आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. त्यांच्या कुटुंबाला या धक्क्यातून सावरण्यास बळ मिळो, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अशी शोकाकुल प्रतिक्रिया शिवसेना माजी जिल्हाप्रमुख प्रकाशभाऊ देसाई यांनी व्यक्त केली. डॉ.मुजुमदार यांनी वैद्यकीय सेवेबरोबरच सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व सेवाभावी क्षेत्रात देखील उल्लेखनीय कार्य केले. प्रत्येक सामाजिक उपक्रमात त्यांचा अग्रगण्य सहभाग असे. सर्वांच्या सुखदुःखात ते सहभागी होत.

मदतकार्यात देखील ते नेहमी पुढे असत. त्यांचे निस्वार्थी व प्रामाणिक कार्य नेहमीच स्मरणात राहील अशी प्रतिक्रिया शेकाप नेते ,तथा जि. प सदस्य सुरेशशेठ खैरे यांनी दिली. डॉ. मुजुमदार हे त्यांच्या प्रेमळ व मनमिळावू स्वभावाने सर्वपरिचीत होते. अनेकांना संकट व अडीअडचणीच्या काळात ते स्वतःहून मदतीला पुढे यायचे. पाली हटाळेश्वर देवस्थान ट्रस्ट मध्ये देखील त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या रूपाने सुधागड तालुका एका सर्वगुणसंपन्न डॉक्टरला मुकला असल्याची प्रतिक्रिया भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांनी दिली. डॉ.मुजुमदार यांच्या निधनाने सारेच हळहळले आहेत. कोरोना काळात त्यांनी तालुक्यात अत्यंत प्रेरणादायी काम केले. वैद्यकीय व्यवसायात त्यांनी प्रत्येकाला न्याय देण्याचे काम केले अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला रायगड जिल्हा अध्यक्षा गीताताई पालरेचा यांनी दिली. डॉ मुजुमदार यांनी सुधागड सारख्या आदिवासी बहुल तालुक्यात आपली वैद्यकीय सेवा देत असताना रुग्णांचे प्राण वाचवणेसाठी नेहमीच पराकोटीचे प्रयत्न केले. वेळ प्रसंगी गोरगरीब रुग्णांना आपली सेवा मोफत उपलब्ध करून दिली. त्यांच्या रूपाने चांगला देवमाणूस हरपला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते अनिरुद्ध कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
अनुमपदादा मित्र मंडळाच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात डॉ.मुजुमदार हे कायम आवर्जून हिरीरीने सहभागी व्हायचे.आम्हाला योग्य मार्गदर्शन व सहकार्य करायचे. आम्हाला कायम त्यांची उणीव भासेल अशी प्रतिक्रिया युवा नेते अनुपम कुलकर्णी यांनी दिली. रिपाईच्या वतीने सुधागड तालुका अध्यक्ष राहुल सोनावळे यांनी तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अमित गायकवाड , मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे यांनी देखील डॉ.मुजुमदार यांना आदरांजली वाहिली. कोरोनाच्या काळात डॉ. मुजुमदार यांनी संपूर्ण तालुक्यातील नागरिकांची जास्तीत जास्त काळजी कशी घेता येईल,तसेच सुधागड तालुका कोरोनामुक्त कसा राहील या ध्यासाने प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य केले. आज त्यांच्या रूपाने खरा कोव्हिडं योद्धा हरपला असल्याची भावनिक प्रतिक्रिया पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी व्यक्त केली. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त करीत आदरांजली वाहिली. डॉ अपूर्व मुजुमदार यांच्या पछात वृद्ध आई, पत्नी व नातेवाईक असा परिवार आहे.







Be First to Comment