सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : 🔷🔶🔷🔶
नागोठण्याजवळील आमडोशी (ता.रोहा) गावातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक तुकाराम नारायण भोसले (वय ७४) यांचे शनिवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, दोन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. वांगणी ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच व विद्यमान सदस्या सौ. रोशनी राजू भोसले यांचे ते सासरे होत.
दिवंगत तुकाराम भोसले यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून आपल्या नोकरीची सुरुवात महाड तालुक्यातून केली होती. त्यानंतर त्यांनी सुधागड तालुक्यातील पेडली, रोहा तालुक्यातील ऐनघर, हेदवली, मेढा, पिगोंडे आदी शाळांत ज्ञानार्जनाचे काम उत्तमरीत्या केले होते. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी दुर्गम भाग असलेल्या उनाठवाडी आदिवासीवाडी प्राथमिक शाळेत उत्तम प्रकारे शैक्षणिक कार्य करून तेथेच ते सेवानिवृत्त झाले होते.
आपल्या शैक्षणिक सेवा काळात त्यांनी अनेक गुणवंत विद्यार्थी घडवित असतांनाच आपल्या मुला-मुलींनाही चांगल्या प्रकारे शिक्षण देण्याचे कर्तव्य त्यांनी पार पाडले. आपल्या प्रेमळ, परोपकारी व दानशूर स्वभावामुळे त्यांनी खूप मोठा मित्रपरिवार जोडला होता. सेवानिवृत्ती नंतरही त्यांनी शिक्षक संघटनेसाठी मोलाचे कार्य केले होते. आमडोशी गावातील सर्वांच्या सु:ख – दुखा:त तसेच सर्व सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या तुकाराम भोसले यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.







Be First to Comment