सुधागडात गोंदाव येथील जिवंत विद्युत वाहिनी तुटून पडल्याने तीन म्हशी व गायींचा जागीच मृत्यू 🔷🔷🔶🔶
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔶🔷🔶🔷
सुधागड तालुक्यातील होतोंड ग्रामपंचायत हद्दीतील गोंदाव येथे जिवंत विद्युत वाहिन्या तुटून चरण्यासाठी गेलेल्या गुरांवर कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत येथील शेतकरी एकनाथ परशुराम पाठारे यांच्या तीन म्हशी व एक गाय जागीच ठार झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत मनुष्यहानी टळली आहे.
या घटनेची एकनाथ पाठारे यांनी विजवीतरण विभाग व पोलिसांना माहिती दिली. विजवीतरण विभागाने या घटनेचा तात्काळ पंचनामा करून तातडीने शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सुधागड तालुक्यात विजवीतरण विभागाचा गलथान कारभार व हलगर्जीपणा सातत्याने समोर आला आहे. अनेक निष्पाप जीवांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे.
वीज समस्येबाबत सातत्याने लेखी व तोंडी तक्रारी व मागणी करून देखील पाली सुधागड विजवीतरण विभाग याकडे दुर्लक्ष करीत आला आहे.त्यामुळे अशा जीवघेण्या घटना सातत्याने घडत असल्याचा संताप गोंदाव ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते महादेव पाठारे यांनी या भागातील विजसमस्या सातत्याने विजवीतरण अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या, मात्र याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत असल्याने अशा दुर्घटना घडतात.
विजवीतरण विभागाने येथील समस्या जलदगतीने सोडवाव्यात अन्यथा ग्रामस्त आंदोलनाचा पावित्रा घेतील असा इशारा पाठारे यांनी दिला आहे. सम्यक क्रांती विचारमंचाचे अध्यक्ष, तथा होतोंड ग्रामस्त मंगेशभाऊ वाघमारे यांनी गोंदाव व आदिवासींवाडीकडे जाणारे अनेक विद्युत खांब जुने व जर्जर झालेले असून धोकादायक स्थितित आहेत.शिवाय विद्युत वाहिन्या देखील लोम्बकळत असून कधीही तुटून जीवितहानी होण्याची दाट भीती आहे.
करचुंडे आदिवासींवाडीत जिवंत विजेच्या तारा तुटून अंगावर पडल्याने दोन लहान बालकांचा मृत्यू झाला होता, याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी विजवीतरण विभागाने अधिक दक्षता घेत होतोंड ग्रामपंचायत हद्दीतील धोकादायक विजेचे खांब बदलावेत, व विद्युत तारांची देखभाल देखभाल दुरुस्ती करावी अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे.
विजवीतरण विभागाने या ज्वलंत व अत्यावश्यक मागणीकडे दुर्लक्ष केल्यास पुढे होणाऱ्या दुर्घटनांना अधिकारी व कर्मचारी हे जबाबदार राहतील असा इशारा गोंदाव ग्रामस्थांनी दिला आहे.
Be First to Comment