एका पोलीसासह शिवसेनेचा स्थानिक नेताही कोरोना पॉझिटीव्ह ###
सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)-###
पोलादपूर तालुक्यात कोरोना संसर्ग झालेल्यांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाटयाने वाढ होत असताना शुक्रवारी प्राप्त झालेल्या कोविड-19 टेस्टमध्ये तब्बल 10 जणांचे स्वॅब रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती सरकारी सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. यामध्ये एका पोलीसासह शिवसेनेचा स्थानिक नेताही पॉझिटीव्ह झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या आता अर्धशतकाकडे झपाटयाने वाटचाल करीत असली तरी सर्व सामाजिक राजकीय उपक्रमांमध्ये वावरणाऱ्या नॉनसिम्पटमॅटिक रूग्णांची संख्या यामध्ये लक्षणीय दिसून आल्याने या रूग्णांच्या संपर्कात अनेकजण आल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पोलादपूर तालुक्यातील उमरठ आणि सडवली येथे मागील दोन पेशंट आढळून आले आणि काटेतळी येथील एका पेशंटचा मृत्यू झाल्याची घटना झाल्यानंतर कोरोनाबाबत काहीशी दहशत ग्रामीण भागामध्ये वाढत असल्याचे दिसून आले. मात्र, स्वाभाविकपणे या रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांची कोविड-19 टेस्ट होणार हे निश्चित झाल्यानंतर स्वॅब कलेक्शन करून पाठविण्यात आले होते. त्या स्वॅबचा रिपोर्ट शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता प्राप्त झाला असून उमरठ येथील फोर्टीस रूग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रूग्णाचे दोन भाऊ आणि घरातील अन्य एक असे तीन जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. आडावळे खडकवाडी येथेही मुंबईत पॉझिटीव्ह असलेल्या मुलांचे आई आणि वडील कोरोनाबाधित झाले आहेत. काटेतळी येथे मृत झालेल्या कोरोना रूग्णाच्या दोन मुलींमध्ये कोरोना संसर्ग दिसून आला. सडवली येथील कोरोना रूग्णाची मुलगी आणि नात पॉझिटीव्ह दिसून आले आहे.याखेरिज, पोलादपूर पोलीस ठाण्यामधील महाड येथे वास्तव्यास असलेल्या सहायक फौजदार पदावरील व्यक्तीचीही कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्याचे या टेस्ट रिपोर्टमध्ये उघड झाले आहे. या आणि मागील रिपोर्टमुळे स्थानिकांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे.
पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात दरड कोसळण्याच्या घटनेनंतर दरड हटविण्याच्या कामादरम्यान 22 तासांत एकही शिवसेनेचा लोकप्रतिनिधी अथवा पदाधिकारी पाहणीसाठी न गेल्याने नेहमी समाजात सातत्याने वावरणारे अचानक दूर का झाले असावेत, अशी शंका तालुक्यामध्ये चर्चेत आली असताना शुक्रवारी सायंकाळी आलेल्या या कोविड-19 टेस्टच्या रिपोर्टनंतर या प्रकाराचा उलगडा होण्यास सुरूवात झाली.






Be First to Comment