सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) 🔶🔷🔶🔷
आंबेडकरी, धम्म चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, तथा रायगड पोलीस दलातील निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भागूराम कृष्णाजी जाधव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
मृत्यूसमयी ते 97 वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी बहुजन चळवळीची मोठी हानी झाल्याची शोकाकुल प्रतिक्रिया विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. भागूराम कृष्णाजी जाधव हे रायगड पोलीस दलातील कर्तव्येनिष्ठ अधिकारी होते. ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर असताना सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी आंबेडकरी चळवळीत झोकून देऊन काम केले.
सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ व मनमिळावू होता. त्यांच्या गोड स्वभावाने ते सर्वाना आपलेसे वाटत. ते शिस्तप्रिय होते. त्यांनी खाकी वर्दीचा सन्मान राखत आपले कर्तव्ये चोखपणे बजावले.
बहुजन समाजात देखील त्यांचा परिचय व लोकप्रियता अधिक होती. अडीअडचणीत, संकटात सापडलेल्या व्यक्तींना ते सतत मदतीचा हात देत. भुकेलेल्या तहानलेल्या व्यक्तींना अन्नदान करून त्यांनी नेहमीच सेवाभावी वृत्ती जोपासली. फुले, शाहू, आंबेडकरी परिवर्तनवादी व पुरोगामी विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. आपल्या मुलांनी उच्च शिक्षित व्हावे, राष्ट्र उत्कर्ष व देशसेवेसाठी योगदान द्यावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यानुसार त्यांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षण दिले. त्यांच्यावर शिस्त, धम्म संस्कार रुजविले. त्यांचे मोठे चिरंजीव प्रकाश जाधव हे पोलीस निरीक्षक पदावर तर विकास जाधव हे वन अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले. आज त्यांचे संपूर्ण कुटुंब देखील आंबेडकरी धम्म चळवळ व सामाजिक कार्यात तन मन धनाने योगदान देत आहे. त्यांच्या पछात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा जलदानविधी दि.25 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता रमाई नगर नागोठणे येथे राहत्या घरी होणार आहे.







Be First to Comment