पितृ श्राद्ध
आपल्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे
आपल्या माणसां विषयी , निसर्गा विषयी , पशू पक्ष्यां विषयी कृतज्ञता व्यक्त करणं.
कारण आपली भारतीय संस्कृती दान , धर्म , परोपकार , त्याग , या अढळ संस्कार मूल्ये असणाऱ्या पायांवर उभी आहे .
मग ती जीवंत जीवांविषयी असो वा आपल्या पूर्वजांविषयी असो , आजचे आपले जे अस्तित्व आहे ते या थोर आपल्या पूर्वजां मुळेच.
पितृ पक्ष म्हणजेच महालय श्राद्ध हे आपल्या हिंदू धर्मात महत्त्वाचे आहे .
सध्या पितृपक्ष पंधरवडा प्रारंभ झाला आहे . ज्याच्यावर आपली श्रद्धा ते श्राद्ध!
भाद्रपद वद्यप्रतिपदे पासून सर्वपित्री अमावस्येपर्यंत पितृ श्राद्ध केले जाते .या पंधरा दिवसातील एक दिवस तिथी नुसार आपल्या मातृ , पितृ, गोत्रातील सर्वच पूर्वजांचे तसेच गुरुं, सहकारी , आप्तेष्ट पूर्वजांचे स्मरण करुन श्राद्ध विधी केले जाते. त्यांच्या स्मरणार्थ दान , धर्म केला जातो.
जेव्हा शेकडो वर्षा पूर्वी कोणत्याही सुविधा नव्हत्या तेव्हा अनेक हाल अपेष्टांचा सामना करुन आपल्या पूर्वजांनी आपला वंश वाढविलाय. त्यांच्यामुळेच आज आपण आहोत हा कृतज्ञता भाव श्राद्धातून व्यक्त केल्या जातो.
पूर्वजांनी आपल्या कुटुंबासाठी दिलेलं योगदान त्याचे स्मरण करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून आदरभाव राखला जातो .
या काळात दिले जाणारे पाणी किंवा तर्पण हा जरी कर्मकांडाचा भाग असला तरी व्यक्ती किंवा समाज मानसिकतेचा विचार केला तर आपुलकी , एकमेकां विषयी प्रेम या माध्यमातून व्यक्त करायचं म्हणून त्याला तर्पण म्हटल गेलं असावं.
या काळात पंचतत्वाचा पृथ्वी , आप , तेज , वायू आणि आकाश यांचाही प्रभाव दिसून येतो .
मुळात निसर्गाचा नियमच निसर्ग सृष्टीचे खऱ्या अर्थाने भरण पोषण करतो.
मूठभर पेरलेल्या धान्यातूंन ओंजळ भरभरून धान्य मिळतं. एका छोट्याशा बीजातूंन वटवृक्ष तयार होतो . ही निसर्गाची खूप मोठी किमया असेल तर मनुष्याने निसर्गाचा हा संस्कार आपल्या मनामध्ये बिंबवला पाहिजे .
निसर्गाने सांगितलेला हा दातृत्वाचा भाव मानवी मनावर संस्काराचा किती तरी मोठा प्रभाव निर्माण करणारा आहे .
केवळ परंपरा म्हणून या रीती रिवाजांकडे न पाहता आपल्या पूर्वजांचे पुण्यस्मरण करणे , त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या आचार , सद्विचार , तत्त्वांना स्मरण करणं . शक्य ते आपल्यात उतरविण्याचा प्रयत्न करणं आणि आपलं आयुष्य समृद्ध करण्याची ही संकल्पना खूप उदात्त स्वरूपाची आहे हे लक्षात येतं. केवळ परंपरे कडे न पाहता त्यामागे व्यापक विचारांचे ऋण केवढे मोठे आहे हे समजून घ्यायला हवं.
आज आपण गुगलच्या मदतीनं सर्व बारीकसारीक गोष्टी , जगाचा इतिहास , जगभरात कुठलीही , कोणतीही हवी ती माहिती सर्च करून मिळवू शकतो . पण आमच्या खापर पणजोबांचे नावही आपल्याला ठाऊक नसते. आपल्या वंशाच्या उगमाचे मुळपुरुष हे विश्वामित्र, जमदग्नी, भारव्दाज, गौतम, अत्री, वसिष्ठ, कश्यप आणि अगस्ती हे आठ ऋषी समजले जातात. त्यांच्यापासून जवळपास ५० हून जास्त प्रमुख गोत्रांचा परिवार निर्माण झालेला आहे हे आपलं धर्मशास्त्र सांगते.
जन्म मृत्यू हे अटळच. पण हा मृत्यूही परमेश्वर चिंतनातच सुखद हवा. आपल्या पूर्वजांना , आपल्याला मोक्षाची प्राप्ती व्हावी ही प्रत्येक मनुष्याची आस असते.
आपले पुर्वज धार्मिक ग्रंथानुसार या कालावधीत मुक्तपणे पृथ्वीवर संचार करतात असा पुरान काळा पासून श्रद्धा भाव आहे
पितृ पक्षात पूर्वजांना त्या तिथी नुसार ब्राम्हणांस किंवा आपल्या कुटुंबातील गेलेल्या व्यक्तीच्या नावाने जेवू घालतात ते त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून , त्यांची यथायोग्य पूजा करून , नैवेद्य दाखवून पिंडदान केले जाते .
पूर्वजांनी आपल्या कुटुंबा साठी दिलेलं योगदान त्याचे स्मरण करून दान धर्म करणे हे आपले उत्तर दायित्व !
जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला
पुढे वारसा हा सदा वाढविला ||
असर्व नम्र स्मरतो त्या पितरांना
नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ||
संगीता थोरात, नवीन पनवेल
Be First to Comment