जेष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन दादा धर्माधिकारी व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचा यथोचित सन्मान ! ###
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे .(धम्मशिल सावंत) ###
रायगड जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस तर्फे जेष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन दादा धर्माधिकारी व प्रशासकीय अधिकार्यांचा नुकताच यथोचित सन्मान केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी मान्यवरांचा सन्मान हा उपक्रम राबविण्यात आला. कोरोनासारख्या जागतिक संकटाचा सामना करीत असताना नव्याने आलेल्या निसर्ग चक्री वादळासारख्या आस्मानी संकटाला धीरोदत्ताने रायगड जिल्हा सामोरे गेला. या वादळाने रायगडसह सबंध कोकण भागात कोट्यावधींची वित्तहानी केली. तसेच अनेक निष्पाप जीवांचे प्राण देखील घेतले. या वादळाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील अनेक भागासह अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन या सागरी किनाऱ्यालगतच्या घरे, वाडे, वृक्ष, विद्युत खांब यांना बसला. येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. वीजपुरवठा खंडित झाला. अशावेळी निसर्ग चक्री वादळावर मात करून परिस्तिती पूर्वपदावर आणण्यासाठी रायगड जिल्ह्यातील अनेक सेवाभावी, मानवतावादी सामाजिक संस्था , संघटना, सामाजिक कार्यकर्ते व प्रशासकीय यंत्रणेने झोकून देऊन काम केले. आपला जीव धोक्यात घालून सामाजिक बांधिलकी जोपासत जनसेवेचा वसा घेऊन काम करणाऱ्या योध्यांचा राष्ट्रवादीने सन्मान केला. चक्रीवादळात मुख्यत्वे अलिबाग नजीकच्या नागाव , चौल , रेवदंडा तसेच श्रीवर्धन मधील अनेक गावांचे मोठे नुकसान झाले. उत्पादनाचे साधन असलेली नारळी, पोफळी, सुपारी, आंब्याची झाडे जमीनदोस्त झाली. याबरोबरच या वादळाने प्रामुख्याने महावितरण विभागाचे तर अतोनात नुकसान केले. परिसरात अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले होते. कित्येक आठवडे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला. विद्युत पुरवठा सुरळीत होण्यास विलंब लागत होता. महावितरण विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नव्हते. परिणामी विजे अभावी अनेक गावे अंधारात बुडाली होती. महावितरणाची ही अडचण लक्षात घेत जेष्ठनिरूपण कार स्वच्छतादूत पद्मश्री पुरस्कृत डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच मार्गदर्शक सचिन दादा धर्माधिकारी यानी मोलाचे सहकार्य केले व वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हजारो हात याकामी पुढे सरसावले. श्री सदस्यांनी ठिकठिकाणी पडलेले विद्युत खांब श्रमदानाने उभे केले, महावितरण च्या साथीने असंख्य विद्युत वाहिन्या जोडल्या. विद्युत पुरवठा सुरळीत केला. या सामाजिक योगदानाबद्दल कृतिज्ञेची भावना व्यक्त करीत नुकतेच जेष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच सचिन दादा धर्माधिकारी त्याच्या निवासस्थानी भेट देऊन
रायगड जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी तर्फे शाल व श्रीफळ देत धर्माधिकारी कुटुंबीयांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याबरोबरच कोरोना व निसर्ग चक्री वादळाची परिस्तिती अत्यंत जबाबदारी व कर्तव्ये दक्षपणे हाताळणाऱ्या प्रशासनातील जाबाज अधिकाऱ्यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवळी, पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम आदींना भेटवस्तू, शाल, श्रीफळ देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गौरविले. यावेळी रायगड जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा चिटणीस आशिष भट , जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चव्हाण तसेच , जिल्हा मुख्य संघटक ऋषीकांत भगत तसेच संजोग पालकर आदी उपस्थितीत होते .
Be First to Comment