कशेडी घाटात दरड कोसळल्याने 24 तास मुंबई गोवा महामार्ग ठप्प- दरडीचा धोका कायमच ! ###
कोकणवासियांकडे दूर्लक्ष आघाडीला परवडणारे नाही-माजी आ.माणिक जगताप यांचा इशारा ###
सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर) ###
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर अनेकठिकाणी महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान लगतचे डोंगर भिंतीसारखे उभे कापण्यात आल्याने सुकेळी खिंडीपासून कशेडीघाट, रघुवीर घाट आणि अन्य सर्वत्र पावसाळयामध्ये भूस्खलन होऊन दरडी आणि मातीचे ढिगारे महामार्गावर कोसळून महामार्ग ठप्प होण्याचे प्रकार घडत असतात. गुरूवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास धामणदिवी गावाच्या हद्दीत सुमारे 75 मीटर्स अंतराच्या रस्त्यावर लगतच्या डोंगरातील लाल मातीची दरड डोंगरावरील झाडांसह कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. रात्रभर दरड हटविण्याचे काम महामार्ग रूंदीकरणाच्या वीर ते कातळीबंगला या कामाची ठेकेदार एलऍण्डटी या कंपनीने तीन जेसीबी प्रोकलेन आणि डंपर्सच्या साहयाने सुरू केले. मात्र, शुक्रवारी सकाळी हे काम सुरू असतानाच पावसाचा जोर वाढून आणखी मोठया प्रमाणात मातीचा ढिगारा दरडग्रस्त महामार्गावर पुन्हा कोसळला. परिणामी, दृष्टीपथात आलेले हे दरड हटविण्याचे काम पुन्हा तब्बल 16 तासांसाठी लांबणीवर गेले आणि सायंकाळी कशेडी घाटातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पुर्ववत् सुरू झाला. मात्र, दरडप्रवण क्षेत्रामध्ये दरडीची टांगती तलवार कायम राहणार असल्याचे स्पष्ट दिसून आले. शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसनेते व माजी आ.माणिक जगताप यांनी दरडप्रवण क्षेत्रात पाहणी केल्यानंतर कोकणवासियांकडे दूर्लक्ष आघाडीला परवडणारे नाही, असा इशारा दिला.
ब्लास्टींगमुळेच दरडप्रवण क्षेत्र बनले धोकादायक, कशेडी घाटाला
पर्यायी रस्ते सक्षम करा,धामणदिवी गावासोबत ठाम-माणिक जगताप
शुक्रवारी आघाडी सरकारमधील घटकपक्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार माणिक जगताप यांनी कशेडी घाटातील दरडप्रवण क्षेत्राची पाहणी करून एलऍण्डटी या ठेकेदार कंपनीचे अभियंता नायडू यांच्याकडून परिस्थितीबाबत माहिती घेतली. यावेळी काल रात्री कोसळलेली दरड 24 तासांत दूर करण्यात आली तरी दरड कोसळलेल्या डोंगरातील मोठमोठे सैल झालेले दगड आणि मातीचे ढिगारे कोणत्याही क्षणी संततधार पावसामुळे पुन्हा कोसळू शकतील, हा धोका स्पष्ट करून माणिक जगताप यांनी याठिकाणी तुळशीखिंड विन्हेरे हा पर्यायी मार्ग रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी व खेडच्या प्रांताधिकारी यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदीच्या नावाखाली बंद केल्याने हजारो कोकणवासिय कशेडी घाट आणि पोलादपूर असे दूतर्फा अडकून पडल्याने कोकणाकडे दूर्लक्ष आघाडीसरकारला परवडणारे नाही असा इशारा देत कोकणाचे नेते वाढदिवस साजरे करताहेत तर स्थानिक आमदार फिरकलेही नाहीत, अशी खंत व्यक्त केली. कोकणास कोणीच वाली नाही, अशी भावना जनतेत रूजविण्याचा हा प्रयत्न आत्मघातकी ठरणार असल्याचे यावेळी त्यांनी निक्षून सांगितले.
धामणदिवी गावाची पिण्याच्या पाण्याची टाकीदेखील डोंगराच्या उत्खननासोबत दरडप्रवण क्षेत्रात धोकादायक झाली असून एलऍण्डटी या ठेकेदार कंपनीने टाकीची व्यवस्था न केल्यास येथील ग्रामस्थांसोबत आपण रस्त्यावर उतरू, अशी भूमिका यावेळी माजी आमदार माणिक जगताप यांनी स्पष्ट केली. यावेळी धामणदिवीचे सरपंच शांताराम पारदूले यांनी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान दरड दरीकडे टाकण्याच्या प्रयत्नात झाल्याने भरपाईची मागणी केली. याप्रसंगी तालुका काँग्रेस अध्यक्ष अजय सलागरे, उपसभापती शैलेश सलागरे, ज्ञानेश्वर सकपाळ तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
गुरूवारी रात्री रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात धामणदेवी गावाच्या हद्दीत दरड कोसळल्याची बातमी मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव, हवालदार दीपक जाधव, गुप्तवार्ताचे पोलीस नाईक इकबाल शेख तसेच पोलीसकर्मी घटनास्थळी पोहोचले. यावेळी एलऍण्डटी या ठेकेदार कंपनीचे तंत्रज्ञ आणि कामगार तसेच जेसीबी प्रोकलेन आणि डम्पर्स आदी यंत्रणा दरडग्रस्त क्षेत्रामध्ये धामणदिवी येथे पोहोचली. यादरम्यान, पावसाने जोर धरला असल्याने मोठया प्रमाणात पावसाच्या पाण्यासोबत चिखलाचे ओहोळही वाहू लागल्याने मोठया जिकीरीने दरड आणि लालमातीचे ढिगारे हटविण्याचे काम एलऍण्डटीकडून सुरू झाले. यावेळी रस्त्यावरील लालमातीचे ढिगारे दरीच्या बाजूकडे ओतण्याचे काम सुरू असताना पडलेल्या मुसळधार पावसामुळे नुकतीच लावणी झालेल्या शेतामध्ये चिखलाचे पाट वाहून गेल्याने शेती नासली. मात्र, रात्रीच्या अंधारात या शेतीच्या नुकसानीची कल्पना कोणासही आली नाही. शेतकऱ्यांची लावणीची मेहनत वाया गेली असल्याने महसूली पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करीत आहेत.
संपूर्ण रात्रभर युध्दपातळीवर दरड हटविण्याचे काम सुरू असताना सकाळी तहसिल कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षाकडून नायब तहसिलदार समीर देसाई यांनी,सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत दरड हटवून घाटरस्ता सुरू होईल, अशी माहिती दिली. मात्र, साधारणपणे साडेनऊ वाजता पावसाचा जोर वाढला आणि पुन्हा त्याचठिकाणी डोंगरातील कातळालगतचा भूभाग महामार्गावर कोसळून मातीचा ढिगारा रात्रीइतकाच कोसळल्याने हे दरड हटविण्याचे काम अधिक वाढले.
कशेडी घाटात कोसळलेली दरड हटविण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे पोलादपूर येथे वाहतुक पोलीसांनी कशेडी घाटातून कोकणात जाणाऱ्या वाहनांना रोखून धरल्यामुळे तब्बल सहा किमी अंतरापर्यंत ट्रक, टँकर्स, कार, टेम्पो आणि मालवाहू गाडयांची रांग उभी राहिली. या वाहनांतील ड्रायव्हर आणि क्लिनर्सना गुरूवारी रात्री आणि शुक्रवारी दुपारी जेवणापासून सर्वच बाबींची कुचंबणा मोठया प्रमाणात हॉटेल व ढाबे बंद असल्याने झाली.
छायाचित्र KASHEDI DARAD MANIK JAGTAP.jpg इमेलवर
फोटो कॅप्शन—–मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात गुरूवारी रात्री दरड कोसळल्यानंतर सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव आणि एलऍण्डटीचे कर्मचारी तातडीने पोहोचले.रात्रभर युध्दपातळीवर दरड हटविण्याचे काम सुरू असताना दरडप्रवण क्षेत्रामध्ये पुन्हा दरड कोसळल्याने दरड हटविण्याचे काम वाढले. यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.माणिक जगताप यांनी दरड हटविण्याच्या कामाची माहिती एलऍण्डटीचे अभियंता नायडू यांच्याकडून घेतली. (छाया-शैलेश पालकर)






Be First to Comment