बदली करणे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार 🔷🔶🔷🔶
राष्ट्रवादी काँग्रेस ची सूचक प्रतिक्रिया 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाईव्ह/ मुंबई. 🌟💠🌟💠
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बुधवारी आलेल्या बदलीच्या आदेशाने त्यांच्या चाहत्या वर्गाला धक्का बसला आहे. तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे मुंबई कार्यालय येथे सचिवपदी बदली करण्यात आली आहे. राज्याचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी यासंदर्भात बुधवारी आदेश जारी केले.
तुकाराम मुंढेंच्या जागेवर राधाकृष्णन बी. नागपुरचे नवीन मनपा आयुक्त राहणार आहेत.
तुकाराम मुढेंची बदली झाल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. याचदरम्यान तुकाराम मुंढेंची बदलीवर ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी देखील आपले मत अवघ्या चार शब्दात मांडले आहे. ‘बदल्या करणं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार’ आहे, असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तुकाराम मुंढेंच्या बदलीमुळे नागरिकांमध्ये नाराजी, राग आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवून राष्ट्रवादीनं एकप्रकारे हात वर करण्याचा प्रयत्न केल्याचंच या प्रतिक्रियेतून जाणवतं.
तत्पूर्वी, तुकाराम मुंढे नागपुरात जानेवारी महिन्याच्या २८ तारखेला रुजू झाले होते. अवघ्या आठच महिन्यात त्यांची बदली मुंबईला करण्यात आली आहे. त्यांची ही आठ महिन्यांची कारकीर्द एका अर्थाने वादळी राहिली आहे.
लोकप्रतिनिधींनी सातत्याने त्यांच्याविरोधात भूमिका घेतली. इतकेच काय तर त्यांच्यावर ‘हुकूमशहा’ अधिकारी अशीदेखील टीका करण्यात आली. दुसरीकडे ‘कोरोना’ संसर्गासंदर्भात मुंढे यांनी सुरुवातीच्या काळातच तातडीची पावले उचलली होती. त्यामुळे सुरुवातीची चार महिने नागपुरात ‘कोरोना’चा संसर्ग नियंत्रणात राहिला होता. मागील काही काळापासून तुकाराम मुंढे विरुद्ध लोकप्रतिनिधी हा संघर्ष पेटला होता. नागपुरचे महापौर संदीप जोशी यांनीदेखील मुंढे यांच्याविरोधात भूमिका घेतली होती.
तुकाराम मुंढे यांची कारकीर्द-
2006-07 महापालिका आयुक्त, सोलापूर
2007 प्रकल्प अधिकारी, धारणी
2008 उपजिल्हाधिकारी, नांदेड
2008 सीईओ, नागपूर जिल्हा परिषद
2009 अति. आदिवासी आयुक्त, नाशिक
2010 के. व्ही. आय. सी. मुंबई
2011 जिल्हाधिकारी, जालना
2011-12 जिल्हाधिकारी, सोलापूर
2012 विक्रीकर विभाग, सहआयुक्त, मुंबई
2016 आयुक्त, नवी मुंबई महापालिका
2017 पिंपरी-चिंचवड परिवहन, पुणे
2018 नाशिक महापालिका आयुक्त
2018 नियोजन विभाग, मंत्रालय
2019 एडस नियंत्रण प्रकल्प संचालक
2020 नागपूर महापालिका आयुक्त
15 वर्षात 14 ठिकाणी बदल्या-
तुकाराम मुंढे यांची १५ वर्षांत झालेली ही १४वी बदली आहे. जवळपास वर्षातून एकदा तरी त्यांची बदली होतेच. नवी मुंबई, नाशिक महापालिकेचे आयुक्त, जालना, सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींशी त्यांचे नेहमीच वाद होत आले आहेत. तुकाराम मुंढे यांना कोरोना झालेला असताना त्यांची बदली करण्यात आल्याने टीका होत आहे.
Be First to Comment