सिटी बेल लाइव्ह / रोहे (शरद जाधव) ###
कोरोनासारख्या महाभयंकर आजारातून नागरिकांची लवकर सुटका होईल असे वाटत नाही. कोरोनाघे भूत मानगुटीवर बसले असतानाच ३ जुन रोजी महाभयंकर चक्रीवादळाने सर्वांनाच चांगला तडाखा दिला.या आपत्तीकाळात.कमी म्हणून की काय वीज बिल ग्राहकांना आलेल्या अव्वाच्या सव्वा विजबिलाने सा-यांचेच डोळे दिपावले असून न्याय कोणाकडे मागावे ? हाच प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे.तर एकीकडे काहीएक रक्कम आपत्ती आली म्हणून मदत करायची आणि दुसरीकडे दुसऱ्या हाताने गरिबांना लुटायचे यातून शासनाची दुटप्पी भूमिका दिसून येत असल्याची सडेतोड प्रतिक्रिया कोलाड विभागातील सामाजिक कार्यकर्ते नामदेव गंभीर यांनी दिली आहे.
याबाबत अधिक प्रतिक्रिया देताना त्यांनी संपूर्ण रोहे तालुकात वाढीव विज बिलांची बोंबाबोंब असून कोरोना सारख्या आपत्ती काळात मीटर रिडिंग न नेताच वीजबीलं ग्राहकांच्या माथी मारली आहेत. तर
पूर्वीच्या वीज वापरावरुन सरासरी बिले काढली असल्याचे अधिकारी वर्गाचे म्हणणे असून आधी वीजबिले भरा मग कमी केले जातील अशीही उत्तरे काहीजणांना देण्यात आली आहेत.वीज बिल वाढीची समस्या ही कायमच ग्राहकांच्या पाचवीला पुजली असून वितरण कंपनीचे उंबरडे झिजविले तरी समस्यांचे कधीही निराकरण होत नसल्याची खंत नामदेव गंभीर यांनी व्यक्त केली आहे.
मागील काही वर्षापूर्वी वीजबिले ही दर तीन महिन्यानी यायची.त्यावेळचे सरासरी बील हे रू.दोनशे ते तीनशे असे असायचे.त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकवर्ग हा आनंदाने आपली बिलं पेड करायचा.नंतरच्या काळात हीच बिलं दरमहा यायला लागली.त्यातच पूर्वीचे विद्युत मीटर जाऊन त्या जागी नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर आले.पूर्वीच्या तीन महिन्यांच्या बिलापेक्षा सध्या दरमहा येणारे बिल हे सरासरी रू.सातशे ते हजार रू.पर्यंत येत असल्याने सर्वसामान्यांना ती परवडण्यासारखे नसल्याने शासनाने याबाबतही विचार करावा असे सर्वसामान्यांचे मत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना महामारी व नैसर्गिक चक्रीवादळाने सर्वांचेच कंबरडे मोडले असताना ब-याचजणांच्या नोक-या गेल्या आहेत,उद्योग व्यवसाय बंद पडून डबघाईला येऊन बंद पडायची वेळ येऊन ठेपली आहे.काही जणांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली असून अशातच शासनाकडून आपत्तीकाळात ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल पाठवून गोरगरिबांची क्रुर चेष्टा चालविली असल्याची स्पष्ट प्रतिक्रिया शेवटी नामदेव गंभीर यांनी शेवटी व्यक्त केली आहे.






Be First to Comment