डेंटल मोदक
“जर तू आधी कधीही मोदक केलेले नसशील तर तुला पहिल्या फटक्यात मोदक जमणे खूपच कठीण आहे. जवळपास अशक्यच म्हण ना!”
माझ्या नवऱ्याने अगदी छातीठोकपणे सांगितले.
“अग ती उकड काढायची, मोदकाचे सारण बनवायचे यातच कितीतरी चुका होतात. मी ऐकायचो ना आई, काकूच्या आणि आजीच्या गप्पा. कधी उकड सैल झाली, कधी कच्चीच राहिली. मोदकाच्या सारण बनवण्यात पण खूप गोची होते अग! गुळाच्या क्वालिटी वर आणि नारळाच्या खोबऱ्यावर पण मोदकाचे सारण अवलंबून असते असे म्हणताना मी ऐकलेय.
बर हे सगळं नीट झालं तरी अॅक्च्युअल मोदक बनवायला पण फार मोठे स्कील लागते. मी काय म्हणतो, कशाला एवढा त्रास घेतेस?आपल्या इथे अगदी कोपऱ्यावर ते घरगुती पदार्थांचे दुकान आहे ना, तिथे मस्त मिळतात मोदक. आपण तिथून चांगले डझनभर मोदक आणू काय! “
माझ्या नवऱ्याने मला मोदक बनवण्यापासून परावृत्त करण्यासाठी जेवढा म्हणून शक्य होता तेवढा प्रयत्न करून पाहिला. तो जसजसा नकारात्मक बोलत होता तसतसा माझा मोदक करून बघायचा इरादा अधिकाधिक पक्का होत होता.
मी माझ्या सासूबाईंना फोन केला. त्यांच्याकडून अगदी बारकाईने मोदकाची रेसिपी विचारून घेतली. आपली सून मोदक तेही उकडीचे मोदक बनवणार आहे याचा त्यांना इतका आनंद झाला की त्यांनी मोदक करण्याची रेसिपी व्यवस्थित लिहून मला व्हॉटस् अॅपवर पाठवली.”
जमतील ग तुला मोदक. एवढे लोकांचे दात काढतेस, एवढ्याशा छोट्या दातात कोरीव काम करतेस मग मोदक का नाही जमणार?
असा मेसेजही पाठवला.
मला एकदम जाणवले, “अरेच्चा खरच की! इथे उकड काढतात तशी आम्ही इंप्रेशन मटेरियल गरम करून कवळीची मापे घेतो तेही अचूक पणे! मोदकाची उकड एकसंध मळतो तसे रबरबेस मटेरियल नीट मळतो. तेही काही सेकंदात. (नाहीतर ते मटेरियल कडक होते आणि वाया जाते)
अगदी मोदकाचे सारण बनवणे सुद्धा फारसे कठीण जाणार नाही.दातात भरायचे सिमेंट बनवताना आम्ही देखील काटेकोरपणे पावडर लिक्विडचे प्रमाण जपतो. आणि दातात कॉंपोझिट भरताना तर केवढे स्किल लागते त्यामानाने मोदकाच्या पारीला कळ्या पाडणे नक्कीच सोप्पे असणार.
या विचारानेच मला खूप आत्मविश्वास मिळाला.
तरीही यूट्युबवर मोदक कसे करतात याचे प्रात्यक्षिक पाहिले.
मोदकाचे सारण बनवताना सासूबाईंना व्हिडिओ कॉल करून सारण बरोबर झाल्याची त्यांनी प्रत्यक्ष पाहून खात्री दिली.
उकड काढेपर्यंत तर त्या बिचाऱ्या अॉनलाईन थांबल्या.
आतापर्यंत सगळे नीट झाले पण प्रत्यक्ष मोदक तर मला एकटीलाच करयला लागणार होते. त्या तिथून इथे कशा मदत करणार?
मी कॉलेजला असताना आमच्याकडे एक शब्द फार प्रसिद्ध होता. GDCजुगाड! म्हणजे काय तर तुम एंड रिझल्ट पे ध्यान दो. क्या करना, कैसे करना वो हम संभालेंगे या फंड्याची आठवण करत मी मोदक करायला घेतले. आई म्हणाल्या की त्या हाताने पारी बनवतात. मी चक्क एक चपटी बशी घेतली तिच्यावर पीठाचा गोळा ठेऊन त्या गोळ्याला बशीच्या सहाय्याने पारीचा आकार दिला. त्या पारीच्या मध्यावर सारण ठेवले आणि चक्क पुरचुंडी केली. त्या पुरचुंडीची टोके मिळवली. साधारण घुमटाचा आकार झाला. त्याला मग बाहेरून हलक्या हाताने कळ्या पाडल्या.
मला युरेका! युरेका! सॉरी सॉरी मोदक! मोदक! असे ओरडावेसे वाटत होते.
सासूबाईंच्या भक्कम सपोर्ट मुळे का असेना मी पहिल्या फटक्यात उकडीचे मोदक बनवले. अगदी ऐश्वर्या राय एवढे सुंदर, सुबक नाही तरी एखाद्या साईड हिरोईन इतके ते मोदक बरे जमले होते.
मोदक पात्रात मोदक उकडल्यावर पहिल्यांदा फोटो काढून सासूबाईंना पाठवले.
हो अर्थात नवऱ्याला पण!
डेंटिस्टशी त्यात ही GDCच्या डेंटिस्टशी अजिबात पंगा घ्यायचा नाही😀😀😀
ता क :-GDC म्हणजे गव्हर्न्मेंट डेंटल कॉलेज मुंबई
डॉ.समिधा गांधी, पनवेल
Be First to Comment