Press "Enter" to skip to content

नागोठणे विभागासाठी रिलायन्स रुग्णवाहिका देणार

कामगारांबरोबरच नागोठणे विभागातील इतर रुग्णांचीही रिलायन्स कंपनीने काळजी घ्यावी : खा.सुनिल तटकरे

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :

नागोठण्यातील रिलायन्स कंपनीच्या कामगारांना कोरोना संसर्ग रोगाची लागण झाल्यामुळे नागोठणे परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून कंपनी आपल्या कामगारांची काळजी घेत आहे परंतु इतर नागरिकांना त्यांच्या कामगारांमुळेच कोरोना संसर्ग रोगाची लागण झाल्याच्या तक्रारी विभागातील सरपंच करीत आहेत. त्यामुळे परिस्थितीची माहिती घेऊन रिलायन्सने कामगांराबरोबरच नागोठणे जि. प मतदार संघातील कोरोना बाधित रुग्णांची काळजी व औषोधोपचार करण्याची व्यवस्था करावी अशा सूचना यावेळी रिलायन्स कंपनीच्या अधिकारी वर्गाला दिल्या. त्यानंतर याबाबत आज संध्याकाळ पर्यंत निर्णय घेऊन कळविण्यात येईल असे कंपनीचे उपाध्यक्ष चेतन वाळंज यांनी खा. सुनिल तटकरे यांना सांगिल्या नंतर याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा असे खा. सुनिल तटकरे यांनी रिलायन्सच्या अधिकारींना निक्षून सांगितले.

रिलायन्स व्यवस्थापन त्यांच्या कामगारांप्रमाणे इतर बाधित नागरिकांची काळजी घेत नसल्याची तक्रार नागोठणे जिल्हापरिषद मतदार संघातील सरपंचांनी रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे केली होती. त्यासंदर्भात खा. तटकरे यांनी तात्काळ दखल घेऊन रिलायन्स व्यवस्थापन, शासकीय अधिकारी व नागोठणे जि. प. मतदार संघातील सरपंच यांची एक महत्वपूर्ण बैठक शनिवार दि. ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता रोहा येथील जेष्ठ नागरिक सभागृहात घेतली.
या बैठकीत खा. सुनिल तटकरे यांच्या समवेत रोहा प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने, रोहा तहसीलदार श्रीमती कविता जाधव, रोहा गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, रोहा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी श्रीमती अंकिता खैरकर, नागोठणे रिलायन्स कंपनीचे उपाध्यक्ष चेतन वाळंज, जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे, नागोठणे पो.नि. दादासाहेब घुटुकडे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मधुकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते नरेंद्रशेठ जैन, भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, रोहा नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, कडसुरे सरपंच राजेंद्र शिंदे, कोंडगाव सरपंच निखिल मढवी, रोहा नगरसेविक महेंद्र गुजर, वरवठणे सरपंच सौ. राजेश्री दाभाडे, दिपेंद्र अवाद, नागोठणे उपसरपंच सुरेश जैन, ग्रा.पं. सदस्य शैलेंद्र देशपांडे आदी उपस्थित होते.

दरम्यान नागोठणे विभागासाठी रिलायन्स कंपनीकडून नागोठणे ग्रामपंचायतीकडे एक रुग्णवाहिका सुपूर्द करण्याचे आजच्या बैठकीत मान्य करण्यात आले असून वाहक व मेंटेनन्सचा खर्च करण्याची जबाबदारी नागोठणे ग्रामपंचायत घेणार असल्याचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ही रुग्णवाहिका नागोठणे जि. प. मतदार संघातील गरजवंतांसाठी नेहमी उपलब्ध राहणार असल्याचे खा. तटकरे यांनी सांगितले. दरम्यान बैठकीच्या प्रारंभी रोहा पं.स. चे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी रोहा तालुक्यातील कोरोना रुग्णांची माहिती खा. सुनील तटकरे यांना दिली. या बैठकी दरम्यान रिलायन्स व्यवस्थापनाचे कौतुक करून खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले की कोरोना संसर्ग प्रादुर्भाव कालावधीत शासनाने केलेल्या लॉकडाऊन कालावधीत रिलायन्स कंपनीने परिसरातील गावातील गरजवंत नागरिकांना अन्नधान्या वाटप करून सामाजिक बांधिलकी निभावली असून रिलायन्सने त्यांच्या कोरोना रुग्णांची जि. प. संघातील सरपंच, महसूल खाते, पोलीस ठाणे यांना तात्काळ माहिती द्यावी तसेच परिसरातील सर्व पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांसाठी सीसीसी ची व्यवस्था करावी अशा सूचना यावेळी खा. तटकरे यांनी रोहा प्रांताधिकारी व रिलायन्स कंपनीच्या अधिकारी वर्गाला दिल्या. कोरोना रुग्णांबाबत योग्य ती काळजी न घेतल्यास शासकीय अधिकारिंची गय केली जाणार नाही अशी स्पष्ट ताकीद यावेळी खा तटकरे यांनी दिली. दरम्यान खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांच्या सुचनेनुसार कोविड रुग्णांची टेस्ट करण्याची शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी खा. सुनिल तटकरे यांच्याकडे केल्यानंतर खा. तटकरे यांनी याबाबत जिल्हाआरोग्य अधिकारी यांना सूचना दिल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात शासनाकडून परवानगी मिळाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर मोरे यांनी खासदार तटकरे यांना कळविले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.