Press "Enter" to skip to content

उरण पुर्व भागातील जनतेने  विचारला वीज वितरण कंपनीला जाब

वीजेच्या लपंडावाने उरणकर हैराण : दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर जनआक्रोश आंदोलन करण्याचा इशारा !

सिटी बेल लाइव्ह / विकास पाटील / उरण #

उरणपुर्व विभागात गेले काही दिवस वीजेचा लपंडाव सुरू असून दोन-दोन दिवस वीज गायब होणे, अचानक वीज पुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्यात सर्वांच्या लाडक्या बाप्पाचा उत्सव तीन दिवसावर येवून ठेपला आहे. तरीही वीज महावितरण कंपनी कोणत्याही उपाययोजना करत नाही.

कोरोनाच्या महामारीत ग्राहकांना आव्वाच्या सव्वा वीज बिले आकारली आहेत ती कमी करण्यात यावीत. या समस्यांने त्रस्त असलेल्या उरणपुर्व भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आज उरण येथील महावितरण कार्यालयावर धडक देत दोन दिवसात उपाययोजना केल्या नाहीत तर तीव्र जनआक्रोश आंदोलन करण्याचा  इशारा दिला आहे. यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीला महावितरण कंपनी जबाबदार असेल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

 पुनाडे  आठ गाव पाणी कमिटी, उरण पूर्व विभाग मित्र परिवार व सामाजिक कार्यकर्ते  यांच्या संयुक्त विद्यमानाने आज अतिरिक्त कार्यकारी अभियंता उपविभाग महावितरण कंपनी उरणवर धडक मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी मागील ३ महिन्यांपासून उरण पूर्व विभागाची सतत वीज पुरवठा खंडीत होत आहे. आणि वादळाचे दिवस सोडले तर वीज खूप वेळा २-३ दिवस गायब असते . ही समस्या संपुर्ण  उरण तालुक्याचीच आहे . वर्षानुवर्षे या विभागाची आणि तालुक्याची विजेची समस्या आहेच . त्यात आता वाढ होवून नागरिकांना वीजे विना दोन-दोन दिवस राहावे लागत आहे ही एक शोकांतिका आहे.  वेळोवेळी  आपणास त्यासाठी संपर्क करतो परंतु आपण त्यावर कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही . मागील आठवड्यात तर खूप वेळा रात्रभर  वीज गायब होती . आम्ही जनतेनी नेहमी रात्रभर असच विजेविना राहायचं का ? आणि आता २-४ दिवसावर आमच्या गणपतीचा मोठा उत्सव आला आहे. त्यामध्ये हे वीज गायब होण्याचे प्रकार दरवर्षी तुमच्या कडून दिसून येतात . आम्ही असे जनतेने किती दिवस आणि किती वेळा अंधारात राहायचे आणि सहन करायचे . तुम्हाला जमत नसेल तर आम्ही आपणास मदत करू आणि उपाययोजना सुचवू पण आमच्या तालुक्याची विभागाची विजेची समस्या कायमस्वरूपी निकालात काढा . येत्या १-२ दिवसात आपण काय ते विजेसंदर्भात उपाययोजना करून  आम्हा जनतेला चांगल्याप्रकारे सुविधा द्यावीत असे निवेदनात म्हटले आहे. 

तसेच काही दिवसापूर्वी झालेल्या वादळामुळे आणि इतर काही गोष्टीमुळे आमच्या विभागात जे विजेचे खांब पडले आहेत त्यांना आपण अद्याप पर्यंत काही ठिकाणी पूर्ववत केलेले नाहीत ते पुर्ववत करण्यात यावेत व पावसाळ्या नंतर काही ठिकाणी  सडलेल्या केबल  लवकरात लवकर बदलण्यात याव्यात. तसेच कोविड च्या काळात आपण आम्हा जनतेस जी भरमसाठ वाजवी बिले देण्यात आली आहेत ती  कमी करण्यात येवून जनतेला  दिलासा देण्यात यावा. विजेच्या लपंडावाचा प्रश्न १-२ दिवसात निकाली निघाला नाही आणि वीज बिलांचा प्रश्न १० दिवसांत  सोडविण्यात आला नाही तर पुढच्या १५ दिवसात उरण पुर्व भागातील जनतेच्या वतीने जन आक्रोश आंदोलन करण्यात येईल.असे निवेदन उरण महाविरण कंपनीचे आतिरिक्त अधिकारी चौंढे यांना देण्यात आले.

यावेळी गोरख रामदास ठाकूर, मतभेदचे पत्रकार दिलिप पाटील, आठ गाव पाणी कमिटीचे कार्याध्यक्ष गुरूनाथ गावंड यांच्या समवेत गावचे सरपंच व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.  या जन आक्रोश आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीला महावितरण कंपनी जबाबदार असेल असेही निवेदन म्हटले आहे याच्या प्रति तहसिलदार उरण. वरिष्ठ पोलिस निरीक्षक उरण,  सहायक आयुक्त यांनाही दिल्या आहेत. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.