सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर) :
स्वातंत्र्यदिनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांच्याहस्ते कोविड-19 विषाणू संक्रमण काळातील लॉकडाऊन प्रक्रियेदरम्यान उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अलिबाग पोलीस ग्राऊंडवर राष्ट्रीय ध्वजवंदन सोहळयानंतर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामधील विविध सरकारी कर्मचारी अधिकारी यांचा गौरव केला.
या सोहळयामध्ये मुळचे चिपळूण येथील रहिवासी असलेले पोलादपूरचे निवासी नायब तहसिलदार समीर देसाई यांच्यासह लिपीक आर.डी.केकाण यांनादेखील सन्मानित करण्यात आले.
तालुक्यातील निसर्ग चक्रीवादळ आणि कोविड-19 विषाणू संक्रमण काळातील लॉकडाऊन प्रक्रियेदरम्यान निवासी नायब तहसिलदार समीर देसाई यांना बंधूशोक होऊन कौटूंबिक संकटांसह आरोग्यविषयक तक्रारीदेखील उदभवल्या असूनही त्यांनी सेवेला प्राधान्य देत चाकरमान्यांना क्वारंटाईन करणे तसेच चक्रीवादळ ग्रस्तांना तातडीने पंचनामे करून सरकारी मदत मिळवून देण्यासाठी तत्परता दाखविली. याखेरिज, आर.डी.केकाण यांनी लिपिक पदाची कामे चोखपणे करून याकाळात जनसेवा केली. यामुळे या दोन्ही सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाची रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दखल घेण्यात आली.
पोलादपूर तालुक्यात निवासी नायब तहसिलदार समीर देसाई आणि लिपिक आर.डी.केकाण यांचा स्वातंत्र्यदिनी झालेल्या सन्मानामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.






Be First to Comment