Press "Enter" to skip to content

चालत्या लक्झरीतील चोरांच्या मुसक्या आवळल्या

कशेडी घाटातील चालत्या लक्झरीतील चोरीप्रकरणी सहा आरोपी महाबळेश्वर पोलीसांकडून अटकेत

आणखी गुन्हे येणार उघडकीस : वाहनांची चोरी करीत पोहोचले महाबळेश्वरला

सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)

तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील रस्त्यावरील खड्डे चुकवित मंद वेगाने जाणाऱ्या लक्झरी बसमधून गुरूवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या चोरीच्या घटनेमधील एक आरोपी पकडल्यानंतर पोलादपूर पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविल्यानंतर अन्य सहा आरोपी पकडण्यात यश आले असून पोलादपूर पोलीसांनी दिलेल्या माहितीवरून महाबळेश्वर पोलीसांनी नाकाबंदी केली असता हे आरोपी पकडले गेले आहे. सर्व आरोपींना 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून अधिक गुन्ह्याचा तपास या अनुषंगाने लागण्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे. दरम्यान, या घटनेतील आरोपींनी मोटारसायकल आणि ऑम्नी व्हॅनची चोरी करून महाबळेश्वर गाठल्याची माहिती प्राथमिक तपासामध्ये उघड झाली आहे.

गुरूवारी दि.13 ऑगस्टला पहाटे कशेडी घाटातील धामणदिवी गावाच्या वळणापासून सुरू झालेल्या खड्डयांच्या महामार्गावरून अतिशय मंद गतीने वळणे पार करीत मुंबई ते गुहागर अशी प्रवासी वाहतूक करणारी पिंपळेश्वर ट्रॅव्हल्सची लक्झरीबस (क्र.एमएच9473) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीच्या दिशेने निघाली असताना एका वळणावर एका प्रवाशाला कोणी अज्ञात व्यक्ती डाव्याबाजूच्या डिकीतील प्रवाशांचे सामान काढून रस्त्यावर टाकत असून अन्य व्यक्ती उचलून नेत असल्याचे दिसून आले. यावेळी सदर प्रवाशाने लक्झरी चालकाला ही घटना सांगून बस थांबायला लावली असता मागील अज्ञात वाहनांतून सदरचे सामान गोळा करून काही अज्ञात व्यक्ती पसार झाल्या. यावेळी धामणदिवी ग्रामस्थांच्या मदतीने सुरू झालेल्या तपासकार्यावेळी एक आरोपी संशयितरित्या पकडण्यात पोलादपूर पोलीसांना यश आले. त्याला पोलादपूर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणल्यानंतर अशोक धर्मराज जाधव (45, उंबरा, ता.कळंब, जि.उस्मानाबाद) येथील फासेपारधी समाजातील व्यक्ती असल्याचे निष्पन्न होऊन त्याने सांगितलेल्या माहितीवरून आणखी पाचजण या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याचे दिसून आले. या गुन्ह्यांत आरोपींनी आठ प्रवाशांचे सुमारे 24 हजार 500 रूपये किंमतीचे घरगुती वापराचे कपडे, चीजवस्तु, रोख रक्कम तसेच गणपतीच्या डेकोरेशनचे सामान असलेल्या बॅगा चोरीस गेल्या आहेत. यासंदर्भात सुनील शंकर दामले (35,साक्री,ता.गुहागर,जि.रत्नागिरी) या लक्झरी चालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा र.नं.42-2020 भा.दं.वि.379,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला येऊन याप्रकरणी पोलादपूर पोलीसांनी सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव यांनी स्वत पुढील तपास सुरू केला.

यावेळी घटनास्थळी पोलादपूर पोलीसांना दोन मोबाईल आढळून आले होते. त्यामध्ये आरोपींचे धबधब्यावर आंघोळ करतानाचे फोटो असल्याने पोलीसांनी नजिकच्या पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यासाठी हे फोटो सर्वत्र व्हायरल केले. यानुसार दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि.14 ऑगस्टरोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर पोलीसांनी चेकपोस्टजवळ एका ऑम्नी व्हॅन सोडून निघून जाताना अटक केली. यादरम्यान पोलादपूरच्या धामणदिवीतील जंगलामधून पसार झाल्यानंतर त्यांचे भोगावच्या दिशेने जाऊन कुडपण रस्त्यावर येऊन रानबाजिरे धरणाकडे येऊन तेथे एका ढाब्याजवळ अनेक दुचाकी आणि चारचाकी गाडया दिसून आल्या. मात्र, चारचाकी गाडयांना सेन्सर असल्याने त्यांनी चारचाकी गाडया चोरताना आवाज होण्याचा धोका लक्षात घेता त्यांनी तो प्रयत्न सोडला. कापडे येथे त्यांनी एक मोटारबाईक चोरली. मात्र, पाच आरोपी असल्याने मोटारबाईक चोरली आणि कापडे पेट्रोल पंपावर गेले आणि तेथील कामगाराची ऑम्नी व्हॅन चोरली. याबाबत पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने ऑम्नी चोरी होऊनही आरोपींचे वर्णन लक्षात आले नाही. यादरम्यान, दिवस उजाडल्याने पाचही आरोपी महाबळेश्वर चेकपोस्टपर्यंत आले आणि ऑम्नी व्हॅन झडती होण्याच्या शक्यतेमुळे ते व्हॅन तिथेच सोडून पसार होऊ पाहात असताना महाबळेश्वर पोलीसांनी त्यांना पकडले. यावेळी सर्व आरोपींचे पाय रात्रभर दरीखोऱ्यातून चालल्यामुळे सोलले असल्याचे दिसून आल्याने महाबळेश्वर पोलीसांचा संशय बळावला आणि त्यांनी हरी शहाजी शिंदे, अनिल लालासाहेब शिंदे, उत्तम सुंदर शिंदे, दत्तात्रय लालासाहेब शिंदे, संतोष पवार (सर्व रा.खामकरवाडी, उंबरा, ता.कळंब, जि.उस्मानाबाद) या पाच जणांना ताब्यात घेतली. सर्व सहा आरोपींना महाबळेश्वर पोलादपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग केले असून या सहा आरोपींपैकी एक आरोपी बालगुन्हेगार असल्याने त्याला त्याच्या पालकांकडे सोपविण्यात आले आहे.

कशेडी घाटातील चालत्या लक्झरी बसमधील चोरीप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरविल्यामुळे केवळ 24 तासांमध्ये सर्व सहाही आरोपी गजाआड करण्यात यश आले असून पाच आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता येत्या 18 ऑगस्टपर्यंत पोलीस रिमांड देण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे या आरोपींनी केलेल्या आणखी काही गुन्हेगारी कृत्यांचा तपास लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.