जय देवी मंगळागौरी
माझी पहिली मंगळागौर सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी आनंदात साजरी झाली. सासुबाई प्रेमळ आणि खूप हौशी होत्या. नातेवाईक पण खूप! त्या सर्वांचे अगत्याने करायच्या. आमच्या घराबाहेर मोठे आंगण होते. सर्व प्रकारची फुले लागत. फुलांची परडी नेहमीच वेगवेगळ्या फुलांनी (रंगीत आणि सुगंधी) भरलेली असे. सकाळी ७ जणींनी मिळून पूजा केली. फुले,दुर्वा,पत्री, डाळी साळी,लेण्या, विड्याची पाने, फळे ,पंचामृत,कापसाची वस्त्रे,धूप दीप लावून अन्नपूर्णे ची साग्रसंगीत पूजा केली. आरती झाल्यावर कहाणीचे वाचन केले.
पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. ज्यांनी पूजा केली त्या मुलींनी मौन व्रत घेऊन जेवायचे असते.
संध्याकाळी जवळपास ५०/६० जणी जगरणासाठी जमल्या. आरती आणि फराळ झाल्यावर खेळला सुरूवात झाली. प्रथम फुगड्या मग उखाणे ह्यात १ तास गेला.
सासरी सर्वांना मंगळागौर चे खेळ येत होत. मला तर खूपसे खेळ माहीतच नव्हते. भोवर भेंडी, आगोटा पागोटा, दिंड्या, नाच ग घुमा, गोफ, झिम्मा, हटू श पान, लाट्या, पाणी लाटा असे किती खेळ एकामागून एक सुरूच होते. सर्व जणी दमल्यावर बैठे खेळ! पहाट कधी झाली ते कळलेच नाही.
मग सगळ्यांची घरी जायची लगबग सुरु झाली. बहिणी , मावशी, मामी, जावा, नणंदा, मावस आते मामे सासवा. सर्वांनी मिळून माझी पहिली मंगळागौर खूप छान साजरी झाली. नेहमीच ती आठवणीत राहील.
श्रावण सुरू झाला की दर वर्षी ३/४ मंगळागौरी पहाटे पर्यंत जागवत असू. अगदी २००८ साला पर्यंत!
आता सर्व सूना नोकरी करतात. विभक्त कुटुंब पद्धती ह्यामुळे रात्रीचे जागरण बंदच झाले.
ज्यांना हौस आहे त्या पूजा करून खेळही खेळतात.
असा हा हासरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण सर्वांना आवडतो.
संपदा बेहरे, नवीन पनवेल.
Be First to Comment