उरण मधील स्थानिक बेरोजगार तरुणांना सुरक्षा रक्षक म्हणून रोजगाराची सुवर्ण संधी
कामगार प्रतिनिधी प्रमोद ठाकूर,जेएनपीटी विश्वस्त भूषण पाटील, उरण सामाजिक संस्था, माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांचा स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्याचा प्रयत्न
सिटी बेल लाइव्ह / उरण (विठ्ठल ममताबादे )
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर उरण मधील अनेक व्यक्तींचे रोजगार बुडाले तर काही जणांच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे उरण मधील स्थानिक भूमीपूत्र असलेल्या बेरोजगार तरुणांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे उरण मधील अश्या स्थानिक भूमीपुत्र असलेल्या बेरोजगार तरुणांना सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्याची संधी कामगार प्रतिनिधी प्रमोद ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त भूषण पाटील, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत असून जास्तीत जास्त उरण मधील स्थानिक बेरोजगारांना उरण मध्येच रोजगार उपलब्ध व्हावा या अनुषंगाने उरणमध्ये सुरक्षा रक्षक नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.
सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्यासाठी उमेदवार कमीत कमी 8 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच तो स्थानिक असावा. मराठी लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे.उरण मध्ये अनेक राष्ट्रीय,विविध कॉर्पोरेट कंपन्या, CFS असून तेथे सुरक्षा रक्षक (सेक्युरिटी गार्ड )ची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. भविष्यातही सुरक्षा रक्षक(सेक्युरिटी गार्ड ) म्हणून रोजगाराच्या अनेक संधी उरण मध्ये खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. मात्र उरण मधील अनेक राष्ट्रीय आंतर राष्ट्रीय प्रकल्प, कपंनी मध्ये परप्रांतीय उमेदवारांची खूप मोठी संख्या सुरक्षा रक्षक म्हणून आहे. परप्रांतीय सुरक्षा रक्षकांमुळे स्थानिक भूमीपूत्र असलेल्या बेरोजगार तरुणांच्या पोटावर पाय देण्यात येत आहे.ही उरणमधील स्थानिक बेरोजगार भूमिपुत्रांच्या दृष्टीने दुर्दैवाची बाब आहे. आज सुरक्षा रक्षक म्हणून कर्मचाऱ्याला 20, 000 रुपये महिना पगार, वैद्यकीय सुविधा(मेडिक्लेम), PF, ग्रॅज्युइटी,बोनस आदी सुविधा महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येत आहे.मात्र उरण मधील स्थानिक भूमीपुत्र या सुविधा पासून वंचित राहिला आहे. उरण मध्ये अनेक कंपन्या, CFS, केंद्रीय प्रकल्प आहेत. मात्र त्यामध्ये उरण तालुका सोडून इतर तालूक्यातील तरुणांची भरती केली जात आहे.या अन्यायाविरोधात उरण मधील कामगार प्रतिनिधी प्रमोद ठाकूर, JNPT विश्वस्त भूषण पाटील, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर अनेक वर्षांपासून आवाज उठवत आहे.व उरण मधील स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.
सुरक्षा रक्षक नोंदणी अभियानांतर्गत रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत उरण तालुक्यातील सर्व उमेदवारांना लागणारे सुरक्षा रक्षक शासन निर्णयानुसार फक्त उरण तालुक्यातील बेरोजगार तरुणांमधून भरती करण्यात यावेत या मागणीसाठी आपण एक अर्ज तयार केला असून या माध्यमातून जमा झालेले अर्ज आपण थेट मा. कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांना देणार आहोत. अशी माहिती यावेळी उरण मधील सुरक्षा रक्षकांचे कामगार प्रतिनिधी प्रमोद ठाकूर यांनी दिली. तरी उरण तालुक्यातील हजारो तरुणांनी, ज्यांना नोकरीची गरज आहे अश्या इच्छुकांनी हे अर्ज भरून आमच्याकडे जमा करावेत.नोकरीसाठी जास्तीत जास्त तरुणांनी नाव नोंदणी करावे असे आवाहन प्रमोद ठाकूर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रमोद ठाकूर फोन नंबर -9220849857,
8779067092 यांच्याशी संपर्क साधावे.






Be First to Comment