सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)
रा.जि.परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेल्या केंद्र प्रमुख म्हणुन सुपरिचित असलेल्या आणि आपले कर्तव्य नेहमीच चोखपणे पार पाडणाऱ्या श्रीमती विद्या बाळाराम रोहेकर यांनी कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत दिलेल्या उत्तम सेवेबद्दल ग्रु. ग्रा.पंचायत आरे बुद्रुक तर्फे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कोरोनाकाळात विद्या रोहेकर यांनी अत्यंत सजगपणे आपले कर्तव्य बजावले असून आरे बुद्रुक ग्रा.पंचायत व परिसरात कोरोना सर्वेक्षणाचे काम,२४ तास नियंत्रण कक्षातील कामकाज, दैनंदिन संसर्गबाबत सर्वेक्षणाचे काम, दैनंदिन बाहेरून आलेल्या लोकांच्या नोंदी ठेवणे त्यांचे विलगिकरण किंवा अलगीकरण यासंबंधी मार्गदर्शन करणे, आदी कामांमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली असून आजमितिसही त्या आपले काम उत्तमरित्या करीत आहेत.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सरपंच हीरा मधुकर ढुमणे,उपसरपंच महेश शिंदे, ग्रामसेवक आर. पी. पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते विद्या रोहेकर यांचा विशेष गौरव करण्यात आला.यावेळी यशवंत शिंदे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खांडेकर व कडू उपस्थित होते.
श्रीमती विद्या रोहेकर व त्यांचे सर्व सहकारी शिक्षकांचे नेहमीच सहकार्य लाभत असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.तर आपण असेच चांगले काम करत रहा आपल्या किर्तीचा सुगंध महाराष्ट्रभर पसरू द्या अशाप्रकारचे गौरद्गार उपस्थित ग्रामस्थांनी काढले.






Be First to Comment