Press "Enter" to skip to content

रेशन दुकानदार, पुरवठा विभागाचा ‘पारदर्शक गैरकारभार’

सिटी बेल लाइव्ह / रोहा /समीर बामुगडे #

सुधागड तालुक्यात पाली, माणखोरे, नागशेत, पिंपळोली, नांदगाव, जांभुळपाडा, भेरव या स्वस्त धान्य दुकानदारांच्या विरोधात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागाकडे येणाऱ्या तक्रारी पाहता, ‘कुछ तो गडबड है दया’ अशी नागरिकांमध्ये कुजबुज आहे.

सिटी बेल लाईव्हमध्ये दिनांक ९ ऑगस्ट च्या अंकात जांभुळपाडा स्वस्त धान्य दुकानदारांकडून धान्य वाटपाबाबत होणाऱ्या हातचलाखीचा लेखाजोखा आम्ही बातमीत मांडला. बातमी तहसिल कार्यालयाला, जांभुळपाड्यातील तथाकथित राजकीय पुढाऱ्यांना व स्वस्त धान्य दुकानदाराला चांगलीच झोंबलेली दिसतेयं.

पुरवठा विभागाने तक्रारदारांची नावे गुप्त ठेवणे अपेक्षित आहे, परंतु संबंधित तक्रारदारांना वेगवेगळ्या व्यक्तींकडून आलेले फोन पाहता तक्रारदारांची नावे पुरवठा विभागाकडूनच पुरवली गेली असणार असा नागरिकांकडून संशय व्यक्त केला जातोय. काही तक्रारदारांना जांभुळपाड्यातील तथाकथित पुढाऱ्यांनी बोलावून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याची चर्चाही आहे.

झोपलेल्या दक्षता समितीच्या सचिवाला व सदस्यांना तर नागरिकांनी त्यांच्याकडे तक्रारी दाखल कराव्यात अशी अपेक्षा आहे, परंतु ‘झोपेचं सोंग घेणाऱ्यांना झोपेतून उठवता येत नाही’ याची त्यांना कल्पनाच नाही. या दक्षता समितीत मराठी माणसांच्या हक्कासाठी भांडणाऱ्या एका राजकीय पक्षाचा तालुका प्रमुखही आहे.

तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागाला असे वाटत असेल की दुकानदार, तथाकथित स्थानिक राजकीय पुढारी यांच्यामार्फत दबाव टाकून आमच्या हक्काच्या धान्याची अफरातफर करू, तर असे होणे नाही असं नागरिकांचं स्पष्ट मत आहे. हे सर्व पाहता दुकानदार, तथाकथित राजकीय पुढारी व पुरवठा विभाग यांचे साटेलोटे असल्याची आम्हाला खात्रीच झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

आपत्तीच्या काळात अस्तित्वात असलेली प्रशासकीय प्रणाली सक्षम बनवून, शासनाने उपलब्ध केलेलं धान्य आदिवासी व गरजू नागरिकांना मिळतं की नाही हे पाहणं ही विभागप्रमुख म्हणून तहसीलदारांची जबाबदारी आहे. ‘आपणास एखाद्याला अन्नाचा घास भरवता येत नसेल, तर निदान
आमच्या ताटातला घास तरी हिसकावू नका’ अशी हात जोडून विनंती नागरिक स्वस्त धान्य दुकानदार व पुरवठा विभागाला करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.