नागरिकांत भीतीचे वातावरण
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
नागोठणे शहराच्या विविध भागातील पदपथावरील बहुतांशी पथ दिवे गेल्या काही दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यावरून काळोखात चालण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. सध्या पावसाळ्यात तर रात्रीच्या वेळेस रस्त्यावरून चालतांना नागरिकांच्या मनात धडकी भरत असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चक्रीवादळामुळे शहरातील बहुतांश भागांत पदपथावरील विद्युत खांब, विजवाहिन्या तसेच विद्युत खांबांवरील बल्ब व एल.इ.डी. ट्यूब लाईटचे नुकसान झाले होते. मात्र आता चक्रीवादळ येऊन गेलेला एक महिना उलटला तरी नागोठणे शहरातील बाजारपेठ, शहरातून प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा मुख्य रस्ता अशाप्रकारे बहुतांश भागातील पदपथावरील दिवे सुरु करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना काळोखातून जावे लागत आहे. सध्या पावसाळी दिवस असल्याने रात्रीच्या वेळेस काळोखातून रस्त्यावरून चालतांना सर्प दंश होण्याची भीती मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ग्रामपंचायतीने शहरातील सर्व भागांतील पथ दिव्यांची पाहणी करुन बंद असलेले पथदिवे लवकरात लवकर सुरु करावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे. दरम्यान पथदिवे सुरु करण्यासाठी सर्व साहित्य उपलब्ध झाले असुन टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व पथदिवे सुरु करण्यात येतील असे ग्रामपंचायत प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Be First to Comment