सिटी बेल लाइव्ह / विचार कट्टा / रघुनाथ भागवत #
संत निरंकारी मिशन दरवर्षी १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाबरोबरच मुक्ती पर्व दिवस साजरा करते. एका बाजुला कित्येक शतकांच्या पारतंत्र्यातून देशाला मुक्त करणाऱ्या भारतीय स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करुन त्यांना वंदन करत असतानाच दुसरीकडे जना-जनाच्या आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या दिव्य विभूती; शहनशाह बाबा अवतारसिंहजी, जगतमाता बुद्धवन्तीजी, निरंकारी राजमाता कुलवंत कौरजी, पूज्य माता सविंदर हरदेवजी तसेच ज्यांनी सत्याच्या प्रचारासाठी आपले जीवन वेचले अशा महान भक्तांना ‘मुक्ती पर्व’ रुपात श्रद्धांजली अर्पण करुन त्यांच्या जीवनातून प्रेरणा प्राप्त केली जाते.
मागील अनेक वर्षांपासून मिशनच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी मुक्ती पर्व दिवसाचे आयोजन होत आले आहे. या दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या आनंदाबरोबरच आत्मिक स्वातंत्र्याने प्राप्त होणाऱ्या दैवी आनंदाचाही समावेश मुक्ती पर्वाच्या रुपाने समाविष्ट केला जातो. मिशनचे असे मत आहे, की सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी जशी राजकीय स्वातंत्र्याची गरज आहे तद्वत शांतीसुखाचे जीवन आणि शाश्वत आनंदासाठी आत्मिक स्वातंत्र्याची नितांत गरज आहे.
अज्ञानतेमुळे केवळ देशवासीयच नव्हे तर संपूर्ण मानवता जात-पात, उच्च-नीच, भाषा-प्रान्त, संस्कृति-सभ्यता, वर्ण-वंश यांसारख्या भेदभावांच्या भिंतींमध्ये जखडलेली आहे. या भिंतींमुळे आत्मिक उन्नती तर दूरच राहो; पण भौतिक विकासालाही खिळ बसते. मिशनचे ठाम मत आहे, की आध्यात्मिक जागृतीद्वारे या सर्व समस्स्या दूर केल्या जाऊ शकतात. जेव्हा आमच्या जीवनात आध्यात्मिक जागृतीचा समावेश होतो तेव्हा मनातील दोषांपासून मुक्ती मिळते आणि सकळजन एकमेकांशी प्रेम, नम्रता व सद्भावपूर्ण व्यवहार करण्यासाठी प्रयत्नशील राहतात.
हा समागम सुरवातीला शहनशाह बाबा अवतारसिंहजी यांच्या धर्मपत्नी जगतमाता बुद्धवन्तीजी यांना समर्पित होता. ज्यांनी १५ ऑगस्ट, १९६४ रोजी आपल्या नश्वर देहाचा त्याग करुन निराकार ईश्वरामध्ये विलीन झाल्या. त्यांच्या स्मरणार्थ आयोजित होणाऱ्या या दिवसाला त्यावेळी ‘जगतमाता दिवस’ असे नांव देण्यात आले होते. जगतमाता बुद्धवन्तीजी या सेवेची प्रतिमूर्ती होत्या. त्यांनी सदोदित नि:स्वार्थ भावाने मिशनची सेवा केली आणि आपले जीवन पूर्णपणे जनकल्याणासाठी समर्पित केले.
बाबा अवतारसिंहजी यांनी १७ सप्टेंबर, १९६९ रोजी जेव्हा आपल्या नश्वर देहाचा त्याग करुन निराकारामध्ये विलीन झाले तेव्हापासून हा दिवस ‘शहनशाह-जगतमाता दिवस’ म्हणून साजरा होऊ लागला. ब्रह्मज्ञान प्रदान करण्याचा विधि, मिशनचे पांच प्रण तसेच मिशनच्या विचारधारेला पूर्णत्व देण्याचे श्रेय बाबा अवतारसिंहजी यांना जाते.
मिशनचे तिसरे गुरु बाबा गुरबचनसिंहजी यांनी या दिवसाला ‘मुक्ती पर्व’ हे नाव तेव्हा दिले जेव्हा मिशनचे प्रथम प्रधान लाभसिंहजी यांनी १५ ऑगस्ट, १९७९ रोजी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. तेव्हापासून या दिवशी मिशनच्या कार्यासाठी ज्यांनी ज्यांनी आयुष्यभर आपले योगदान दिले त्या सर्व महान भक्तांचेही स्मरण केले जाऊ लागले.
बाबा गुरबचनसिंहजी यांच्या धर्मपत्नी राजमाता कुलवंत कौरजी यांनी आपल्या अतुलनीय कर्माद्वारे वर्षानुवर्षे या सत्य, प्रेम व मानवतेच्या मिशनचा प्रचार केला. त्यांनी आपले संपूर्ण जीवन मिशनच्या सेवेसाठी समर्पित केले. १७ वर्षे बाबा गुरबचनसिंहजी यांच्या समवेत आणि ३४ वर्षे बाबा हरदेवसिंहजी यांच्या समवेत त्या निरंतर आपल्या सेवा निभावत राहिल्या. २९ ऑगस्ट, २०१४ रोजी निरंकारी राजमाताजी यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग करुन त्या निराकार ईश्वरामध्ये विलीन झाल्या. त्यानंतर सन २०१५ पासून मुक्ती पर्व दिवसाला त्यांचेही स्मरण केले जाते.
बाबा हरदेवसिंहजी महाराज २०१६ साली ब्रह्मलीन झाल्यानंतर माता सविन्दरजी यांनी सद्गुरु रुपात संत निरंकारी मिशनची धुरा सांभाळली. त्या आधी ३६ वर्षे त्यांनी बाबा हरदेवसिंहजी यांच्याबरोबर सावलीप्रमाणे राहून मानवतेच्या कल्याणामध्ये आपले योगदान दिले. त्या प्रेम आणि करुणेचे जीवंत उदाहरण होत्या. शारीरिक प्रकृती साथ देत नसतानाही त्यांनी दोन वर्षे आपल्या दोन वर्षांच्या अल्प कालखंडामध्ये मिशनच्या प्रचार-प्रसाराच्या कार्यामध्ये खंड पडू दिला नाही. पूर्ण समर्पण भावनेने त्यांनी मानवतेच्या कार्याला पुढे नेले. म्हणूनच त्यांना Strength Personified (शक्तीरुपा) असेही म्हटले जाते. पूज्य माता सविन्दर हरदेवजी यांनी ५ ऑगस्ट, २०१८ रोजी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला आणि निराकार प्रभुमध्ये विलीन झाल्या. मागील वर्षापासून मुक्ती पर्व दिनी त्यांचेही स्मरण करुन त्यांना श्रद्धासुमने अर्पित केली जाऊ लागली आहेत.
माता सविन्दरजी यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग करण्यापूर्वी काही दिवस अगोदर दि.१७ जुलै, २०१८ रोजी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्याकडे मिशनचा कार्यभार सोपविला होता. तेव्हापासून दिवस-रात्र एक करुन मानवकल्याण व समाजकल्याणाच्या कार्यामध्ये त्यांनी स्वत:ला समर्पित केले आहे.
Be First to Comment