बुधवारी दोन कोविड रुग्ण वाढले ###
सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर) ###
तालुक्यातील एकाही स्थानिक व्यक्तीला न शिवलेल्या कोरोनाने परगावातून आलेल्यांमध्येच संसर्ग झाल्याचे वारंवार सिध्द केले असून रविवारी पुणे येथून आलेल्या चौघांची रत्नागिरीतील कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात कोविड-19 टेस्ट करण्यात आल्यानंतर त्यापैकी एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असता त्यास पनवेल येथे रवाना करण्यात आले आणि तेथेच त्याचा मृत्यू झाल्याच्या माहितीला तालुका प्रशासनाने दुजोरा दिला आहे. यामुळे पोलादपूर तालुक्यात कोरोनाबळींची संख्या दोन झाली आहे. अद्याप, दोघे कोविड-19 पॉझिटीव्ह रूग्ण महाड येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असून सुमारे 30 कोविड-19 पॉझिटीव्ह रूग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतल्याची माहिती आरोग्य विभागातील आयुषचे डॉ.राजेश शिंदे यांनी दिली आहे. यावेळी आज बुधवारी सडवली आणि उमरठ येथील प्रत्येकी एक असे दोन रुग्ण कोविड-19 पॉझिटीव्ह झाल्याने कोरोना रुग्ण संख्या ३५ वर गेली असल्याचेही यावेळी डॉ.राजेश शिंदे यांनी सांगितले.
एक 35वर्षीय तरूण पुणे येथे कोविड-19 पॉझिटीव्ह रूग्ण असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तेथून पोलादपूर तालुक्यातील धारवली आंग्रेकोंड येथे आला असताना त्याला ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे प्राथमिक शाळेमध्ये क्वारंटाईन करण्यात आले. यानंतर त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षण आढळून आल्यानंतर महाड येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले. अन्य एका कोविड-19 पॉझिटीव्ह रूग्णावर उपचार सुरू असून उपचार घेणाऱ्यांची संख्या दोन आहे. पुणे येथून काटेतळी येथे 1 जून रोजी आलेल्या चौघांची रत्नागिरीतील कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात कोविड-19 टेस्ट करण्यात आली. यापैकी 51 वर्षीय पांडूरंग सिताराम वाडकर यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आणि त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना महाड येथे व तेथून पनवेल येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र, तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलादपूर तालुक्यातील स्थानिक एकाही व्यक्तीस कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले नसून आतापर्यंत 34 जणांना संसर्ग होऊन दोघे दगावले आणि दोघांवर उपचार सुरू आहेत तर 30 कोविड-19 पॉझिटीव्ह रूग्णांवर उपचार होऊन ते घरी परतले आहेत.






Be First to Comment