Press "Enter" to skip to content

सिटी बेल लाइव्ह स्पेशल रिपोर्ट : कोरोनाचे Side Effect

जिम मालक-ट्रेनर आर्थिक विवंचनेत : बॉडीबिल्डरांचा ‘जोर’ सोशल मीडियावर ###

सिटी बेल लाइव्ह / भिवपुरी (गणेश मते) :

अनेक बॉडीबिल्डर्सनी लाखोंचे कर्ज घेऊन अत्याधुनिक व्यायामशाळा (जिम) सुरू केल्या. मात्र, कोरोनाचे वाढते प्रमाण आणि सोशल डिस्टनसिंग यामुळे व्यायामशाळा जवळपास साडेतीन महिन्यांपासून बंद आहेत. कोरोना महामारीचा फटका व्यायामशाळा आणि ट्रेनर्सना चांगलाच बसला आहे. मात्र, काही हौशी शरीरसौष्ठवपटू सोशल मीडियावर बघून व्यायाम करतात; ते शरीरासाठी घातक आहे, असे जिम मालकांसह ट्रेनर सांगतात.

पावसाळा सुरू झाला की शरीरसौष्ठवसाठी तरुण आजकाल अत्याधुनिक जिमकडे वळतात. मात्र यंदा कोरोना महामारीमुळे सर्वच व्यवसाय डबघाईला आले आहेत. त्यातच निश्चित धोरण नसल्याने अनेक जिम मालक मेटाकुटीला आले असून भाड्याने घेतलेल्या गाळ्यांचे भाडे कसे भरणार, बँकेचे हप्ते कसे भरणार, दुरुस्ती, लाईट बिल, पाणी बिल, याचा खर्च कसा भरून काढायचा, हे करतानाच कुटुंबियांची उपजीविका कशी करायची, असा प्रश्न आहे. तसेच, लॉकडाऊन खुला झाल्यानंतर जिममध्ये कोणी येईल की नाही, याबाबत शंका आहे. दरम्यान यामुळे अनेकांनी परवडत नसल्याने आणि भाडे भरण्यासाठी आपले जिमचे साहित्य कमी किमतीत विकायला काढले आहे, असे जिम व्यवसायिकांनी सांगितले.

जवळपास साडेतीन महिन्यांपासून जिम बंद आहेत. त्यामुळे अनेक हौशी तरुण सोशल मीडियावर पाहून वर्कआउट करतात. मात्र, सोशल मीडियावर पाहून व्यायाम करणे घातक आहे. याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीची शरीरयष्टी वेगळी असते. यामुळे त्यांना मार्गदर्शनाची गरज असते. त्याच्या वजनानुसार आणि शरीरानुसार ते ठरवले जाते. सोशल मीडियावर पाहून व्यायाम केल्यास काहीवेळा इजा होऊ शकते किंवा अतिव्यायाम केल्यास परिणाम होऊ शकतो. त्यासाठी व्यायाम करणाऱ्यांना आहाराबाबत मार्गदर्शन अत्यंत गरजेचे असते. आहार चुकला तर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे जिम ट्रेनर सांगतात.
दरम्यान, या व्यवसायाकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या सर्व जिम बंद असल्याने व्यवसाय डबघाईला आला आहे. यात बहुतांशी व्यावसायिक तरुण असल्याने सरकारने कर्ज घेतलेल्यांना काही प्रमाणात सूट द्यावी आणि सकारात्मक नियम करणे गरजेचे आहे, अशी जिम मालक, ट्रेनर यासह शरीरसौष्ठवपटूंची मागणी आहे.

घरीच हलका व्यायाम करा
घरच्या घरी व्यायाम केल्यास व्यायाम करणाऱ्या हौशी तरुणांना फायदा होईल. त्यासाठी रनिंग, जोर-बैठका, पुशप्स, पुलप्स अशा साध्या व्यायामावर भर द्यावा. तसेच अंडी, चिकन, ओट्स, कडधान्य, दूध, पनीर असा आहार घेणे चांगले आहे. याचा शरीरावर नक्कीच सकारात्मक परीणाम होतो, असा सल्लाही ट्रेनर्स देत आहेत.

ट्रेनर्सनाही कामाची पद्धत बदलावी लागणार
जिम मागील काही महिने बंद आहेत. यामुळे आमच्या नोकरीकम व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. कुटुंबाच्या उपजीविकेबाबत प्रश्नचिन्ह आहे. जर ट्रेनरचाच फिटनेस नसेल तर कोणीही येणार नाही. सोशल डिस्टनसिंग आणि संसर्गामुळे सर्व ठप्प झाले आहे. ट्रेनर्सना भत्ता अन्यथा काही मदत द्यावी. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांवरही परिणाम होऊ शकतो. तसेच ट्रेनर्सनाही आता आपली पद्धत बदलावी लागणार आहे. घरगुती पद्धतीने व्यायाम करताना ऑनलाइन मार्गदर्शन शक्य आहे. यातून कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही. तसेच जवळपास 60 टक्केपेक्षा अधिक फायदा होऊ शकतो.

  • महेश विशे, जिम ट्रेनर, ठाणे

सोशल डिस्टन्स ठेवून जिममध्ये व्यायाम शक्य
कोरोना महामारीचा व्यावसायिक शरीरसौष्ठवपटूंना मोठा फटका बसला आहे. मात्र कोरोना हा आजार संसर्गजन्य असला तरी सरकारी नियमानुसार सोशल डिस्टनसिंग, मास्क- सॅनिटायझर यांचा वापर करत आणि मर्यादित प्रवेश देऊन व्यायाम करणे शक्य आहे. लॉकडाऊनचा शरीरसौष्ठवपटू, जिम मालक आणि ट्रेनर यांच्यावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच, व्यायाम बंद असल्याने शारीरिक व्याधीदेखील होऊ शकतात. यासाठी घरीच जोरबैठका, पुशप्स, पुलप्स, रनिंग करणे हा चांगला व्यायाम आहे. त्याचप्रमाणे योग्य आहार घेतल्यास फायदा होईल. सरकारने या व्यवसायाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.

  • सचिन कांबरी, शरीरसौष्ठवपटू, बार्डी-कर्जत

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.