Press "Enter" to skip to content

कोरोना विरोधातील लढाईत ‘सुदर्शन’ची साथ

सिटी बेल लाइव्ह / रोहे / समिर बामुगडे #

कोरोना महामारीने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. सामाजिक, आर्थिक परिस्थिती प्रतिकूल बनली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या नोकर्‍या गेल्यात, उद्योगधंदे ठप्प झालेत; अर्थचक्र थांबलेय. हातावरचे पोट असणार्‍यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. त्यातून कोरोनाची लागण झाल्यास उपचाराचा खर्च आणि उपलब्धतेविषयीची स्थिती चिंता वाढवणारी आहे. मात्र, ही एक लढाई आहे. आपल्याला एकत्रितपणे पण शारीरिक अंतर ठेवून लढायची आहे. गेल्या चार महिन्यात या लढाईचा आपण चांगल्या रीतीने सामना करतोय. दुर्दैवाने काही भागात रुग्णसंख्या वाढतेय. मात्र, ही साखळी तोडण्यासाठी आपल्या सगळ्यांचे योगदान मोलाचे आहे. कोरोना विरोधातील या लढाईत ‘सुदर्शन परिवार’ आपल्यासोबत आहे असा विश्वास दिला आहे तो सुदर्शन कंपनी व्यवस्थापनाने.

व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार ‘सुदर्शन’ ही पहिली कंपनी आहे, जिथे वेळीच उपाययोजना केल्या गेल्या आणि आपल्या कामगारांवर पुण्यातील अत्याधुनिक सेवा असलेल्या खासगी रुग्णालयात उपचार करत आहे.

कंपनी व्यवस्थापनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अन्न, निवार्‍याची सोय अध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण, सामाजिक दृष्टिकोनातून आणि पर्यावरणास शाश्वत राहून एकत्रित पुढे जाऊया, या उद्देशाने कार्यरत ‘सुदर्शन’ सुरुवातीपासूनच कोरोनाच्या या परिस्थितीशी सचोटीने लढा देत आहे. मार्च-एप्रिलपासून कामगारांची काळजी घेतली जात आहे. कामगार, कुटुंबीय, परप्रांतीय मजूर, तसेच महाड, रोहा, श्रीवर्धन आणि पुण्यातील पाच हजारांहून अधिक कुटुंबाना एक महिन्याचे धान्य, जीवनावश्यक वस्तूसंच पुरविण्यात आले. रोजंदारीवर असलेल्या परराज्यातील कामगारांना अन्न व दैनंदिन जीवनावश्यक वस्तू देण्यावर भर दिला आहे. कामगारांना मास्क, सॅनिटायझर आणि कॅन्टीनची सुविधा उपलब्ध केली आहे. शिवाय, 106 स्थलांतरित मजुरांना निवारा-जेवण उपलब्ध केले आहे. रायगड जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी, त्यांच्या पशुपालनासाठी सहाय्य दिले आहे.
 
आरोग्य सुविधांचे बळकटीकरण
आरोग्यसेवेतील मूलभूत सुविधांना बळकट करण्यासाठी सरकारला 10 व्हेेंटिलेटर्स, स्थानिक पातळीवर सरकारी रुग्णालयात व्हेंटिलेटर्स, सिरिंज पंप आणि ब्लड मॉनिटरिंग सिस्टिम व इतर वैद्यकीय उपकरणे, औषधे उपलब्ध करून दिली आहेत. बचतगटातील 100 हून अधिक महिलांच्या माध्यमातून ‘सुदर्शन’ पुरवलेल्या कच्च्या मालापासून उत्कृष्ट दर्जाचे एक लाख कापडी मास्क तयार करून वाटले आहेत. त्यातील तीस हजार आरोग्य विभाग, पोलीस विभाग, आशाताई आणि ग्रामीण आरोग्य केंद्रात वाटप केले. कामगारांसह कुटुंबीयांची आरोग्यतपासणी करण्यासह मास्क, सॅनिटायझर देण्यात आले आहे. ‘सुदर्शन’शी संलग्न 14 गावात आरोग्य स्वच्छतेसह कोरोनापासून बचावासाठी घ्यावयाची काळजी याचे मार्गदर्शन केले, तर बारा आरोग्य कर्मचार्‍यांनाही गुणवत्ता प्रशिक्षण दिले. याशिवाय ‘सुदर्शन’ने कर्मचार्‍यांना रक्तदान करण्यास प्रोत्साहन दिले आहे; बरोबरच सरकारमान्य रक्तपेढीची माहिती पुरविण्याचेही काम सुरु आहे. रोहा उपजिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण केंद्रात रोज निर्जंतुकीकरण, सुरक्षारक्षक, जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या विलगीकरण केंद्राचे बहुतांशी व्यवस्थापन सुदर्शन पाहत असून, शहरात त्याचा प्रसार होऊ नये, यासाठी काळजी घेत आहोत.

उपचाराचा खर्च ‘सुदर्शन’कडे
24 जुनला कंपनीत पहिला रुग्ण आढळल्यानंतर तातडीने रोहा प्लांटचे काम बंद करून त्याच्या संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण केले. ‘सुदर्शन’शी संबंधित कोरोना रुग्णावर पुण्यातील सिम्बायोसिस रुग्णालयात उपचार होत आहेत. कंपनीच्या प्लांटवरून रुग्ण नेण्यापासून, पुण्यात उपचार व उपचारानंतर घरी सोडण्यापर्यंत सर्व खर्च कंपनी करत आहे. सर्वांवर अतिशय चांगले उपचार होत असून, सुदैवाने आजवर एकही रुग्ण ‘क्रिटिकल’ नाही. ‘सुदर्शन’चे व्यवस्थापन, वरिष्ठ अधिकारी रुग्ण व नातेवाईकांच्या सतत संपर्कात आहेत. शासकीय यंत्रणेला वेळोवेळी माहिती पुरवली जात आहे. आजवर जवळपास 75 रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार होत आहेत.

कोविड मेडिकल टास्क फोर्स
कोरोना संकटापासून बचावासाठी ‘सुदर्शन’ने पूर्णवेळ ‘कोविड मेडिकल टास्क फोर्स’ (सीएमटीएफ) उभारलेय. व्यवस्थापकीय संचालक राजेश राठी यांच्या निरीक्षणाखाली हे टास्क फोर्स काम करीत असून, यामध्ये वरिष्ठ अधिकारी व वैद्यकीय अधिकार्‍यांचा, तज्ज्ञांचा समावेश आहे. कामगार व कुटुंबियांसाठी कोविड केअर हेल्पलाईन 24 तास सुरु आहे. सर्व कुटुंबाना मेडिकल किट देण्यात आलेले आहेत. एक कोविड ऍम्ब्युलन्स तत्पर सेवेसाठी उपलब्ध आहे. यासह ‘सुदर्शन’ कामगार कॉलनीत निवासी डॉक्टरांची व्यवस्था केली असून, कोविड तज्ज्ञांची टीम रोहा येथे नियमितपणे भेट देत आहे. तसेच कोविड चाचणी घेण्यासाठी शासनमान्य लॅबची मदत घेत आहोत; जेणेकरून शासकीय यंत्रणेवरील ताण कमी होईल.

संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण
कंपनीने आजवर कामगारांच्या आरोग्याला प्राधान्य दिलेले आहे. हीच परंपरा लक्षात घेत तातडीने उच्च दर्जाच्या निर्जंतुकीकरण करणार्‍या संस्थेमार्फत संपूर्ण परिसराचे, कॉलनीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. कंपनीचा परिसर, कॉलनी अधिक सुरक्षित राहावी, याकरिता काही नियमावली तयार केली आहे. काही ठिकाणी अत्यावश्यक काम सुरु असून, तिथेही फिजिकल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन, मास्क, सॅनिटायझरचा वापर अनिवार्य केला आहे. रोहामध्ये चार आणि महाडमध्ये दोन अशा वेगवेगळ्या झोनमध्ये विभागणी केली आहे. 15 लोकांचा एक गट करून त्यात सबझोन केले आहेत. ग्लोव्हज, मास्क, फेसशील्ड अनिवार्य आहे. अतिशय नियोजनबद्ध विलगीकरणाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

विलगीकरण कक्षाची उभारणी
कंपनीच्या परिसरात कामगार व त्यांच्या नातलगांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्षाची उभारणी केली आहे. त्यामध्ये गरजेनुसार वाढ करण्यात येत असून, सर्व आरोग्यसुविधा पुरवल्या जात आहेत. कोरोनाबाबत जनजागृतीसाठी कोविड तज्ज्ञ डॉक्टरांचे इंग्रजी आणि मराठीतून लाईव्ह वेबिनार होताहेत. विलगीकरण कक्षातील, उपचार घेत असलेल्या, तसेच स्थानिक नागरिकांसाठी सकारात्मक मार्गदर्शन सत्रे घेतली जात आहेत.कोरोनाबाबत जनजागृती अभियान, लाईव्ह वेबिनार्स, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन सत्रे सुरु असल्याचे सुदर्शन ने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात स्पष्ट केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.