सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
कर्जत शहरात ठाणे जनता सहकारी बँकेच्या शाखेचे उदघाटन करण्यात आले असून रेल्वे स्टेशन नजीक ए टी एम सुविधा सुद्धा सुरू करण्यात आली आहे. या बँकेची ही 137 वी शाखा असून तब्बल 51 वर्षांनंतर बँकेची शाखा सुरू करण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली.
कर्जत रेल्वे स्थानका समोर दुबे मेंशन या इमारतीत ठाणे जनता सहकारी बँकेच्या शाखेचा उदघाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फीत सोडवून शाखेचे उदघाटन करण्यात आले. तसेच ए टी एम चे उडघटनही करण्यात आले. याप्रसंगी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शुभलक्ष्मी शिराळे, विभागीय व्यवस्थापक विनायक नवले, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, बँकेचे सदस्य आदी व्यासपीठावर उपस्थित होते. शाखा व्यवस्थापक सौरभ फाटक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सहाय्यक सह व्यवस्थापक विष्णू रानडे यांनी प्रास्ताविकात बँकेचा चढता आलेख सादर केला.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना शरद गांगल यांनी, ‘ही भरवशाची बँक आहे असा विश्वास ग्राहकांना वाटतो. आम्ही सहकारी चळवळ जिवंत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहात. ठेवीदारांना वाढीव व्याज देण्यापेक्षा त्यांचे पैसे कसे सुरक्षित राहतील. याकडे आम्ही लक्ष देतो. ठेवीदार कर्जदार यांचा ताळमेळ राखण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करतो. सामाजिक भान असलेली ही बँक आहे. बँकेचे आयुर्मान दहा – बारा नसावे 75 – 100 वर्षे असावे. या भूमिकेचे आम्ही आहोत. चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही करू. राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा चांगले व आधुनिक तंत्रज्ञान आमच्याकडे आहे.’ असे स्पष्ट केले. शुभलक्ष्मी शिराळे यांनी बँके बद्दल माहिती सांगून कर्जतकरांचा विश्वास आम्ही नक्की संपादन करू.’ असे सांगितले. जयंत वैद्य यांनीही आपले विचार मांडले. आभार प्रदर्शन विनायक नवले यांनी केले.
याप्रसंगी जयंत वैद्य, ऍड राजेंद्र निगुडकर, मोहन ओसवाल, राजाभाऊ कोठारी, संतोष दगडे, विक्रम वैद्य, श्रीकांत ओक, पांडुरंग गरवारे, अनिल शहा, चंद्रशेखर जोशी, पांडुरंग देशमुख, जयंत पाटकर, गोपाळ गांगल आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment