झेंडूच्या फुलांनी फुलली कर्जतची बाजारपेठ
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजया दशमी म्हणजेच दसरा या सणा निमित्ताने शहरातील बाजारपेठ झेंडूच्या फुलांनी फुलून गेली असून खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे.
दसरा सणाच्या निमित्ताने शहरात चैतन्यमय वातावरण झाले असून, या दिवशी झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असल्याने आज पासूनच शहरातील मुख्य बाजार पेठ, कर्जत हायवे, चारा फाटा आदी ठिकाणी झेंडूच्या खरेदी विक्रीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात बाजारात झेंडूची फुले विक्रीसाठी दाखल झाली आहेत. मात्र या दिवशी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने किमतीत देखील वाढ झाली आहे. 80 ते 100 रुपये किलो दराने बाजारात फुलांची विक्री होत आहे.
झेंडूच्या फुलांसोबतच तोरण आपट्याची पाने अर्थात सोने खरेदीसाठी देखील नागरिकांनी बाजारात गर्दी केली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आपट्याच्या झाडांची पाने तसेच आंब्याच्या फांद्या विक्रीस बाजारात आणल्या आहेत. शहर परिसरात आपट्याची पाने दुर्मिळ असल्याने नागरिकांकडून त्याची खरेदी केली जाते आहे.
दुचाकी, चारचाकी खरेदीसाठी गर्दी दसरा निमित्ताने खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी शहरातील दुचाकी चारचाकी वाहनांच्या शो रूम तसेच गृहोपयोगी वस्तू व सोने बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. दसरा असल्याने खरेदीसाठी बाजारात अनेक ऑफर्स देखील देण्यात आल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास स्टॉल लावण्यात आले आहेत.
Be First to Comment