Press "Enter" to skip to content

देश – परदेशातून येतात भाविक

कर्जतमध्ये रविवारी फातिमा मातेची 88 वी तीर्थयात्रा

सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆

कर्जत मधील ख्रिश्चन धर्मियांचे प्रार्थना मंदिर ( चर्च ) गेल्या काही दशकांपासून फातिमा माऊलीच्या नावाने प्रसिद्ध आहे. प्रत्येक वर्षी 13 ऑक्टोबर नंतर येणाऱ्या रविवारी या मातेची तीर्थयात्रा असते. पूर्वी रेल्वे सेवेच्या फेर्या कमी होत्या त्यावेळी मध्य रेल्वे कडून काही विशेष गाड्या मुंबईहून कर्जतसाठी सोडण्यात येत असत. विशेष म्हणजे राज्यच नव्हे तर देश परदेशातूनही ख्रिश्चन बांधव या यात्रेसाठी आवर्जून उपस्थिती लावतात. या रविवारी 15 आक्टोबर रोजी ही तीर्थयात्रा असल्याने सध्या यात्रेची जय्यत तयारी चर्च चे फादर लुईस कझार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

1920 साली फातिमा माऊलीचा पुतळा पोर्तुगाल देशातील लिस्बन शहरापासून 110 किलोमीटर अंतरावर असलेल्या फातिमा नावाच्या छोट्या खेडेगावातून कर्जतमध्ये आणला. कर्जत रेल्वे स्थानका नजिकच्या प्रार्थना मंदिरामध्ये ठेवण्यात आला. या बाबतची अख्यायिका अशी आहे की, 13 मे 1917 रोजी फातिमा गावातील जेसिंटा, फ्रांसिस व लुसिया ही तीन बालके आसपासच्या परिसरात आपली मेंढरे चारत असतांना पवित्र मरिया माऊलीने त्यांना दर्शन दिले. पुढील जून, जुलै, ऑगष्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या पाच महिन्यात प्रत्येक 13 तारखेला याच तीन बालकांना मरिया माऊलीने पुन्हा दर्शन दिले व जगातील प्रत्येक मनुष्य पापांपासून कसा वाचविला जाईल व त्याला स्वर्गीय वैभव कसे प्राप्त होईल हा संदेश दिला. मरिया माऊलीने फातिमा गावात दर्शन दिल्याने तिला फातिमा हे नाव देण्यात आले.

1917 साली शेवटचे दर्शन 13 ऑक्टोबरला दिल्याने दरवर्षी 13 ऑक्टोबरला रविवार आल्यास किंवा त्यानंतर येणाऱ्या रविवारी फातिमा माऊलीची तीर्थयात्रा कर्जतमध्ये भरते यावेळी मुंबई, पुणे, नाशिक या शहरांसह महाराष्ट्रातून तसेच देश परदेशातून ख्रिश्चन धर्मिय बांधव फातिमा मातेच्या दर्शनासाठी आवर्जून येतात व कर्जतच्या निसर्गरम्य परिसरात फिरून मौज मजाही करतात. या तीर्थयात्रेच्या निमित्ताने तालुक्यातील आदिवासी बांधव स्वतः पिकवलेल्या काकड्या चर्चच्या परिसरात आणून विक्रीसाठी ठेवतात. विशेष म्हणजे केवळ ख्रिश्चन बांधवच नव्हे तर अन्य धर्मिय सुद्धा आपला नवस फेडण्यासाठी येथे उपस्थित असतात.

कर्जत व फातिमा मातेचे नाते अगदी घट्ट आहे त्याचे कारण असे कि, श्रीमंत चिमाजी अप्पांनी वसई वर मोहीम आखली त्यावेळी वसई पंचक्रोशीत जी – जी चर्च होती त्यांच्याकडे आपला मोर्च्या वळविला त्या मोहिमेत काही चर्चचे मनोरे ढासळून गेले, काही चर्चच्या मनोर्यांवरून मोठ मोठ्या घनता आणण्यात आल्या त्यातील एक भली मोठी घनता कर्जत मार्गे भीमाशंकरच्या शिखरावर नेली व नाना फडणविसांनी भीमाशंकराच्या हेमान्द्पान्ठी मंदिरात ती बसविली. या घंटेवर पवित्र मरिया माऊलीची छोटीशी मूर्ती कोरलेली आहे. त्यामुळे 1740 च्या सुमारासच मरिया माऊलीचे कर्जतशी नाते जुळले आहे. या रविंवारी 15 ओक्टोबर ला 88 व्या तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले असून भाविकांच्या सेवेसाठी कर्जत परिसरातील ख्रिश्चन बांधवां बरोबरच कर्जतकर सुद्धा सज्ज आहेत. काही वर्षांपूर्वी मुंबईहून कर्जत करीता मोजक्याच लोकल गाड्या होत्या त्यावेळी फातिमा मातेच्या यात्रेच्या दिवशी मध्य रेल्वे प्रशासन कर्जत करीता सकाळी व संध्याकाळी विशेष लोकल गाडी सोडत असे मात्र आत्ता कर्जत साठी लोकल गाड्यांची संख्या वाढल्याने मध्य रेल्वेने विशेष गाड्या सोडणे बंद केले. तसेच वाहनांची संख्या वाढल्याने ख्रिश्चन धर्मीय आप आपली वाहने घेऊन येतात.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.