समोसेवाल्या तरुणांनी रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना घातला गंडा
सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
मागील काही महिन्यांपासून रायगड जिल्ह्यात बेरोजगार तरुणांनाची नोकरीच्या आमिषाने फसवणूक करण्याचे प्रकार घडत असताना पेण मध्येही रेल्वे गोदामात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून समोसे विक्री करणारा संतोष थोरात यांने हजारो तरुणांची फसवणूक करून कोट्यावधी रूपयांना गंडा घातल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी पेण पोलीस ठाण्यात केली आहे.
याबाबत त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना सांगितले की,
पेण येथील समोसे विक्रेते संतोष थोरात व त्यांचे अन्य साथीदार यांनी भारतीय रेल्वे माल गोदामात नोकरीचे आमिष दाखवून जवळपास १४०० ते १५०० बेरोजगार तरुणांची फसवणूक केली असल्याची लेखी तक्रार पेण पोलिस ठाण्यात केली आहे.भारतीय रेल्वे माल गोदाम श्रमिक संघातर्फे नोकरीचे आमिष दाखवून संबंधित गोरगरीब तरुण, तरुणी, विवाहित महिला, पुरुष यांच्याकडून गेली एक ते दीड वर्षांपासून फॉर्म भरून रजिस्टर नोंद करून सुरुवातीस फॉर्म फी म्हणून दोन हजार व नोकरी लावण्यासाठी प्रत्येकी पंचवीस हजार असे एकूण २७ हजार रूपये पेणसह रायगड, मुंबई, ठाणे, कोकण या विभागातील लोकांकडून कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनात येत आहे.जर यामध्ये तरुणांनी पैसे भरुन कित्येक महिने होत आले तरी देखील नोकरी मिळत नसल्याने सदर युवकांची फसवणूक झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने याची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही तक्रारीत केल्याची माहिती पत्रकार परिषदेत हरिष बेकावडे यांनी दिली आहे.
पेण तसेच इतरही भागातील तरुणांची अशी आर्थिक फसवणूक झालेली असेल तर त्यांनी पेण पोलिस स्टेशनला संपर्क साधून लेखी तक्रार करावी.तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
देवेंद्र पोळ – पोलिस निरिक्षक, पेण
Be First to Comment