Press "Enter" to skip to content

अल्पवयीन मुलगी सारा ठाकूर हिच्या मृत्यू प्रकरणी नागरिकांचे ठिय्या आंदोलन

सिटी बेल ∆ पेण ∆

पेण तालुक्यातील जिते गावात राहणाऱ्या एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचा दि.२६ रोजी सर्पदंशाने उपचाराभावी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असतांनाच या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पावसाळी अधिवेशनात सुद्धा या घटनेचा आवाज उठवला गेला.त्यामुळे उपचार अभावी मृत्यू झालेल्या सारा ठाकूर हिच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात समोर ठिय्या आंदोलन केले.या आंदोलनामध्ये तालुक्यातील सामाजिक, राजकीय यासह असंख्य नागरीकांनी सहभाग घेतला होता.तर जिते येथील सामाजिक कार्यकर्ते लिलाधर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील पेण उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपलब्ध नसलेल्या समस्यांबाबत सदरचे ठिय्या आंदोलन करण्यात आले यामध्ये दोषी असलेल्या डॉक्टरांना तात्काळ निलंबित करावे, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालय पेण येथील सर्व डॉक्टर्स व नर्स यांना चोवीस तास उपलब्ध राहवे, प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालय येथे चोवीस तास रुग्णवाहिका व चालक उपलब्ध असावे, रुग्णालयात सर्व औषध उपचार उपलब्ध असावे, सर्व डॉक्टर्सना प्रशिक्षण द्यावे, रुग्णालयामध्ये ईसीजी, रक्त तपासणी, व्हेंटिलेटर, सोनोग्राफी यासह अन्य मिशनरी तात्काळ उपलब्ध करावेत तसेच तज्ञ डॉक्टर्स रुग्णालयात दिवस व रात्र उपलब्ध असावेत या मागण्यांसाठी सदर आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाची दखल घेता जिल्हा प्रभारी शल्य चिकित्सक शितल जोशी, पेण वैद्यकीय अधीक्षक संध्यादेवी राजपूत यांनी वरिष्ठ जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याशी तातडीने संपर्क साधून सदर मुलीच्या मृत्यू प्रकरणात संबंधित असणाऱ्या डॉक्टरांना दोषी ठरवाणा-या डॉ.प्रिती पाटील यांना या प्रकरणात दोषी ठरवून निलंबित करण्यात येत असल्याचे संबंधित आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिल्यानंतर या ठिय्या आंदोलनाची सांगता करण्यात आली.

यावेळी कैलास म्हात्रे, गोरख तांडेल, निलेश तांडेल, जनार्दन म्हात्रे, निखिल म्हात्रे, सलोनी तांडेल, गजानन म्हात्रे, दिपेश ठाकूर, विशाल भोईर यांच्यासह अनेक गावांतील नागरीक उपस्थित होते.

पेण उपजिल्हा रुग्णालयामध्ये मागच्या चार दिवसांपूर्वी सारा ठाकूर या अल्पवयीन मुलीचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला ही गंभीर बाब असून उपजिल्हा रुग्णालयामध्ये अनेक समस्या उद्भवत असल्याने याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची यासंदर्भात तात्काळ भेट घेऊन पेण उपजिल्हा रुग्णालयामध्ये नागरीकांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडविण्यात येणार असल्याचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कोकण समन्वयक वैकुंठ पाटील यांनी सांगितले आहे.यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पेण पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.