पाणीपुरवठा बाबतीत प्रितम म्हात्रे आक्रमक : पायोनियर मधील जलकुंभाची केली पाहणी
सिटी बेल ∆ पनवेल ∆
उन्हाळ्यात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी पाणीटंचाई होती. परंतु पावसाळा सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले तरीसुद्धा पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे काही परिसरात नागरिकांना आजही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशावेळी काही जागृत लोकप्रतिनिधी कार्यकाळ संपला असताना सुद्धा विविध नागरी समस्यांचा सतत पाठपुरावा घेत असतात. याचाच प्रत्यय आज पनवेल मधील पायोनियर मधील नागरिकांना आला.
पायोनियर विभाग येथे नवीन जलकुंभाचे काम पूर्ण होऊन वर्ष उलटले तरी अद्याप जोडणीचे काम झाले नाही. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे करत होते.आज अखेरीस त्यांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना घेऊन या टाकीची पाहणी केली असता त्यांना तेथे अनेक त्रुटी आढळल्या. त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाला केबिन नाही,तसेच पाईप लाईन जोडणीचे काम पूर्ण झाले नाही. कारणकी नव्याने केलेल्या रस्त्यात सिमेंट काँक्रीटकरण झाल्यामुळे तेथे ब्रेकिंग करून पुन्हा तिथे काम करावे लागणार. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना यावेळी संथगतीने सुरू असलेल्या कामाबद्दल त्यांनी जाब विचारला.
यावेळी तेथील उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रितम म्हात्रे यांना पुढील दोन दिवसात जोडणी करून लवकरच या जलकुंभावरून पायोनियर परिसरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, मा.नगरसेविका सौ.प्रीती जॉर्ज, गणेश म्हात्रे, स्थानिक सोसायटीमधील पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
नव्याने जलकुंभ बांधून वर्ष उलटला. तो सुरू करण्यासाठी मी सतत पाठपुरावा करतोय. जलकुंभाला मारलेला कलर सुद्धा शेवाळ लागून पुन्हा करायची वेळ आली परंतु अजून पाणीपुरवठा सुरू झाला नाही याबाबतीत आज पाहणी करून अधिकाऱ्यांना जाब विचारून पुढील काही दिवसातच नियोजित पाणीपुरवठा सुरू झाला पाहिजे असे सांगितले अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या कार्य पद्धतीत आम्ही तो सुरू करू घेऊ.
– प्रितम म्हात्रे
( माजी विरोधी पक्षनेते )

Be First to Comment