Press "Enter" to skip to content

पनवेल येथे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केंद्र

सुरक्षा साक्षरता असणारा कामगार वर्ग निर्माण करण्यासाठी ए एन एस यू चा पुढाकार

सिटी बेल ∆ पनवेल ∆

ए एन एस यू च्या ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी इन्स्टिट्युट चे रविवार दिनांक ९ जुलै रोजी पनवेल येथे उद्घाटन संपन्न झाले. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील डेरवली येथील या इन्स्टिट्यूट मध्ये नैसर्गिक वायू आणि कच्चे खनिज तेल काढणाऱ्या केंद्रांवर अत्यावश्यक असणारा सुरक्षा साक्षर कामगार वर्ग निर्माण केला जाणार आहे. या क्षेत्रातील अनुभव संपन्न आणि दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या फॅकल्टीमुळे या इन्स्टिट्यूटला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठी नैसर्गिक वायू आणि कच्चे तेल निर्माण केंद्र (ऑईल रीग) यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ठिकाणी लागणारा कामगार वर्ग हा नुसताच कुशल असून चालत नाही तर अत्यंत संवेदनशील, ज्वलनशील आणि अपघात प्रवण क्षेत्र असल्यामुळे येथील कामगार वर्ग हा सुरक्षा साक्षर असणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. पनवेल तालुका आणि उरण तालुका या ठिकाणी असणारे केंद्र सरकारचे अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प यामुळे नैसर्गिक वायू आणि कच्चे खनिज तेल निर्मिती क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. या ठिकाणी कुशल आणि सुरक्षा साक्षर कर्मचारी वर्गाची अत्यंत निकड भासत आहे. म्हणूनच योग्य वेळी ए एन एस यू च्या ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी ची सुरुवात झाल्याने कामगार वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

ए एन एस यू चे संचालक सिद्धेश भोई आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की, व्यवसायांची निकड म्हणून सुरक्षा साक्षर कर्मचारी वर्ग निर्माण करणे हे गरजेचे असले तरी देखील एक कर्मचारी हा मनुष्य आहे, त्याचा जीव लाखमोलाचा आहे.त्याच्यावरती त्याच्या कुटुंबाची जबाबदारी असते म्हणून शून्य अपघात हे ध्येय डोळ्यापुढे असले तरी देखील त्या कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये हेच खरे अंतिम ध्येय असते. पनवेल क्षेत्रात अशा कर्मचारी वर्गाची फार गरज निर्माण झाली आहे. सुरक्षा साक्षर झाल्याने कर्मचाऱ्यांचा जीव सुरक्षित तर आहेच शिवाय पदोन्नती आणि बेटर प्रोस्पेक्ट्स च्या अनुषंगाने देखील सेफ्टी कोर्स पूर्ण करणे गरजेचे असते.

सिद्धेश पुढे म्हणाले की, नैसर्गिक वायू आणि तेल खनिज निर्माण करणाऱ्या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम केलेले दिग्गज येथे फॅकल्टी म्हणून उपलब्ध असणार आहेत. विल्यम डेव्हिड, सचिंद्रन कुमारन, केदार रोडगे, शरीफ कामेल, वल्ला अहमद अतिया, शेल्डन क्रेडो अशा दिग्गजांचे मार्गदर्शन कामगारांना मिळणार आहे. याशिवाय आय एस ओ, इंटरनॅशनल वेल कंट्रोल फोरम, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ड्रिलिंग कॉन्ट्रॅक्टर्स, लिफ्टिंग इक्विपमेंट इंजिनिअरिंग असोसिएशन, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ सेफ्टी अँड हेल्थ अशा आंतरराष्ट्रीय संस्थांशी आमची इन्स्टिट्यूट संलग्न असेल. मर्यादित बॅच असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष असून 50 टक्के थिअरी आणि 50% ऑन द जॉब ट्रेनिंग देण्यावरती आमच्या संस्थेचा भर असणार आहे.

संस्थापक संचालक सिद्धेश भोई यांना या क्षेत्रातील दोन दशकांहून अधिक वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी या विषयाची पदवी इंग्लंड मधून प्राप्त केलेली आहे. विविध ठिकाणी कार्यरत असताना त्यांच्या सुरक्षा कौशल्यामुळे
तब्बल वीस वर्षे शुन्य अपघात मॅनेजमेंट करण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती आहे. याच कालखंडात जगभरातील १९ देशांतील विविध आस्थापनांच्यासोबत काम करत शून्य अपघात ध्येय डोळ्यापुढे ठेवून सुरक्षा यंत्रणा राबविण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदीर्घ अनुभवाचा इन्स्टिट्यूट मध्ये येणाऱ्या कामगार विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.