सिटी बेल ∆ पनवेल ∆
जन्मदिनाचे हिडीस उदात्तीकरण न करता समाजाचे काहीतरी भले करावे व समाजोपयोगी उपक्रमांतून आपला वाढदिवस साजरा करावा ही शेतकरी कामगार पक्षाची शिकवण. शेतकरी कामगार पक्षाच्या ट्रान्सपोर्ट सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार युनियन चे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रभुदास भोईर उर्फ अण्णा हे आजही पक्षाने दिलेली शिकवण तंतोतंत अमलात आणत आहेत. म्हणूनच २० जून रोजी ३८ व्या वर्षात पदार्पण करणारे प्रभुदास भोईर यांनी त्यांचा जन्मदिवस विविध समाज उपयोगी उपक्रमातून साजरा केला.
कार्यक्रमाची सुरुवात खिडूक पाडा येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ आणि चॉकलेट्स वाटून करण्यात आली. त्यानंतर आदिवासी समाजाच्या गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य आणि दप्तर यांचे वाटप करण्यात आले. याच कार्यक्रमात तब्बल 37 वर्ष आणि पाच महिने अत्यंत प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रमिला महादेव घरत यांचा सेवापूर्ती प्रित्यर्थ प्रभुदास भोईर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रमिला घरत यांच्या मनमिळावू पद्धतीने आणि आपुलकीने केलेल्या संगोपनामुळे त्यांच्यावरती प्रेम करणारा फार मोठा वर्ग खिडुकपाडा गावामध्ये आहे. त्यांनी संगोपन केलेली कित्येक मुले आज व्यवसाय रोजगार करू लागले आहेत, कित्येकांचे संसार थाटले आहेत.
त्यानंतर पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुरेश भोईर यांच्या सौजन्याने प्रभुदास भोईर यांच्या जन्मदिनाच्या प्रित्यर्थ दहावी आणि बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. प्रत्येक जन्मदिवस प्रभुदास भोईर हे समाज उपयोगी उपक्रमातून साजरा करत असल्याबद्दल जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी त्यांचे आभार मानले. तर तमाम शिक्षकवृंदाने औक्षण करून प्रभुदास भोईर यांचे जन्मदिनानिमित्त अभिष्टचिंतन केले.
प्रभुदास भोईर यांनी जन्मदिनाच्या निमित्ताने पनवेल तालुक्यातील विविध वृद्धाश्रमांना फळे,बिस्किटे आणि नित्यक्रमात लागणाऱ्या वस्तूंचे वाटप केले. सनीप रामा कलोते संचालित क्षितिज पर्व फाउंडेशनचे जनाधर्मा निराधार व वृद्धाश्रम, प्रमोद पाटील संचलित वर्लेश्वर निराधार गृह व वृद्धाश्रम आणि संगीता जोशी संचलित स्नेहकुंज वृद्धाश्रम येथील ज्येष्ठ नागरिकांना फळे,बिस्किटे आणि नित्यक्रमात लागणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. सनीप कलोते यांनी प्रभुदास भोईर करत असलेल्या उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली तसेच त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
खिडूक पाडा राजीप शाळेत झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खैरनार मॅडम आणि श्रीराम खुडे यांनी केले. यावेळी मुख्याध्यापिका घरत मॅडम, गायकवाड मॅडम, कांबळे मॅडम, साखरे मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुरेश शेठ भोईर, बजरंग दल कुलाबा जिल्हा संयोजक संजय नथुराम उलवेकर , भूषण म्हात्रे, गुरुनाथ ठाकूर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गणेश भोईर, धनाजी भोईर, देवदास भोईर, अमर उलवेकर, रोहिदास ठाकूर,विजय उलवेकर,दादा भोईर,सतीश उलवेकर,सूरज गोंधळी आदी मान्यवरांच्या सह समस्त खिडूकपाडा ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज शिकणारी मुले ही आपल्या देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या शैक्षणिक कार्यकर्दीमध्ये आपले देखील थोडेफार योगदान असावे या उद्देशाने आज आम्ही मुलांना दप्तर आणि शालोपयोगी साहित्याचे वाटप केले. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो याच भावनेतून कुठल्याही भपकेबाज कार्यक्रम न घेता मी समाजोपयोगी कार्यक्रम करण्याचे योजिले. आज निराधार,वृद्ध मंडळींच्यात गेल्यावरती मनामध्ये एक विषण्ण भावना आली. आज माझ्यावरील मातृछत्र आणि पितृछत्र हरपले आहेत पण समाजात अशी देखील काही मुले आहेत ज्यांना आपले माता पिता नकोस झाले आहेत हे पाहिले की वाईट वाटते. मी येथील वृद्धाश्रम चालकांना काही लागले तर आवर्जून कळवा असे आश्वासन दिले आहे आणि त्यांना जे जे काही लागेल ते देण्यासाठी मी संपूर्णपणे प्रयत्न करीन.
– प्रभुदास भोईर.
Be First to Comment