सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
मुंबई-गोवा महामार्गासह पेण-खोपोली मार्गावरून मागील अनेक वर्षांपासून असंख्य कंपन्यांमधील विविध प्रकारचा कच्चा आणि पक्क्या मालाची अवजड व ओव्हरलोड वाहतूक मोठया प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येत असतानाही संबंधित शासकीय वाहतूक अधिकारी याकडे कानाडोळा करीत असल्याने यावर तात्काळ कारवाई करीत जिल्ह्यातील ओव्हरलोड वाहतूक बंद करावी अन्यथा याकरीता रस्त्यावर उतरावे लागेल अशा प्रकारचे निवेदन सामजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला दिले आहे.
रायगड जिल्ह्यातील कंपन्या व बंदरे यामधील पीएनपी, जेएनपीटी पोर्ट, दिघी पोर्ट, जेएसडब्ल्यू, आरसीएफ, पोस्को, इंडो एनर्जी व अन्य कंपन्यांमधुन लोखंडी कॉईल, कोळसा, सल्फर (खत), माती पावडर, चीप, रेती, खडी व इतर मालवाहतूक ही अवैधरित्या ओव्हरलोड होत आहे.
विशेष म्हणजे ही वाहतूक गेली अनेक वर्षे सुरू असल्याने मुंबई – गोवा तसेच पेण-खोपोली महामार्ग यामुळे नादुरुस्त तसेच अनेक ठिकाणी खचत आहे तर या वाहतुकीने अनेकांचे प्राण सुद्धा घेतले आहे.मात्र याकडे संबंधित अधिकारी कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाहीत.अनेक पेण तालुक्यातील सामजिक संघटनांनी आवाज उठवला परंतु कायमस्वरूपी याकडे कानाडोळा झाला आहे.संबंधित अधिकारी आणि काही राजकिय दलाल यांच्यातील संगनमताने ही ओव्हरलोड वाहतूक राजरोसपणे सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.
एकीकडे ओव्हरलोड वाहतुकीबाबत सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढून तसेच कारवाईचे आदेश देऊनही या आदेशाची पायमल्ली अधिकारी वर्ग करीत आहेत. ओव्हरलोड वाहतूकीच्या या महामार्गावरून दरमहा ३०० ते ४०० ओव्हरलोड गाड्या धावत असून यात अधिका-यांसह दलांलाचा वाटा असल्याचे हरिष बेकावडे यांनी निवेदनात सांगितले आहे.
याबाबत लवकच केंद्रीय परिवहन मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्य परिवहन मंत्री, आयुक्त व इतर संबंधित अधिकाऱ्यांकडे या वाहतुकीस अभय देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची निलंबनाची व त्यांच्यासह दलालांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी लवकरच करण्यात येणार असल्याचे सामजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी दिला आहे.








Be First to Comment