स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत कर्जत तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात ध्वजारोहण न केल्याने चौकशी कमिटी स्थापन
सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆
१५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी दिनांक १३ ते १५ ऑगस्ट रोजी शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्याचे शासकीय आदेश असताना कर्जत तालुक्यातील १६ पैकी १४ पशुवैद्यकीय अधिका-यांनी भारताचा तिरंगा ध्वज फडकविला नाही. याबाबत अनेक स्थानिक तसेच जिल्हा व राज्य पातळीवरील अनेक वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित झाल्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅक्टर शामराव कदम यांनी १४ पशुवैद्यकीय अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावुन खुलासा करण्याचे आदेश तालुका विस्तार अधिकारी यांना दिले होते. यावर तालुका विस्तार अधिकारी यांनी पंचायत समितीत आलेले तिरंगा ध्वज फाॅल्टी असल्याने त्यांना दिले नाहीत तसेच बाहेरून ध्वज घेऊन ध्वज फडकावावा असेही सांगितले होते.
परंतु, हा खुलासा योग्य नसून शासन आदेशानुसार “हर घर तिरंगा” अभियान जिथे स्तंभ नाही अशा ठिकाणी देखील काठीच्या साहाय्याने ध्वज उभे करून “हर घर तिरंगा” ह्या अभियानात सामिल व्हायचे होते. पण येथील पशुवैद्यकीय डॉक्टर दवाखानात ध्वजारोहण न करता चक्क गैरहजर होते. तिरंगा न फडकविल्याने सोशल मिडीयावर देखील नागरीक संताप व्यक्त करत होते.
याबाबत चौकशी करता विलंब लागत असल्याने तसेच तालुक्यातील दोशी पशुवैद्यकीय अधिका-यांना पाठीशी घालण्यात येत असल्यामुळे कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर चंदने यांनी मुख्यमंत्री महोदयांना आपले सरकार पोर्टलवर दिनांक ६ डिसेंबर २०२२ रोजी तक्रार दाखल केली होती.
त्या तक्रारीची दखल घेत त्यांनी चौकशीचे आदेश काढले असून याबाबत डाॅक्टर प्रशांत धनजय कांबळे प्रादेशिक सह आयुक्त पशुसंवर्धन विभाग मुबंई यांनी चौकशी कमिटी नेमली असून या कमिटीचे अध्यक्ष डाॅक्टर बी. व्ही. जिचकर प्रादेशिक सह आयुक्त हे चौकशी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
कर्जत तालुक्यातील सुमारे १४ पशुवैद्यकीय अधिका-यांनी देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर साजरा करण्यासाठी १३ ते १५ ऑगस्ट २०२२ ह्या कालावधीत “हर घर तिरंगा” हा देशाभिमान जागृत करणारा उपक्रम राबविण्यासाठी विशेष मोहीम शासकीय आदेशान्वये जारी केला होती. त्या शासकीय आदेशानुसार देशातील हर एक नागरिकाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन शहरापासून गाव खेड्यांपर्यंतच्या वाडी वस्तीतील देशबांधवांनी उत्स्फूर्तपणे १३ ते १५ ऑगस्ट २०२२ ह्या कालावधीत आपल्या घरांवर ध्वज फडकवुन जागतिक स्तरावर आपला देशाभिमान दाखवुन दिला असताना कर्जत तालुक्यातील सुमारे १४ पशुवैद्यकीय अधिका-यांनी “हर घर तिरंगा” हा शासकीय आदेश पायदळी तुडवल्याचा निंदनीय प्रकार केला असुन अशा बेजबाबदार अधिका-यांवर देशद्रोहाचाच गुन्हा दाखल करण्यात यावा अशी सामान्य नागरिकांमध्ये चर्चा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. देशाभिमानी नागरिक चौकशी कमिटीच्या अहवालाकडे व पशुवैद्यकीय अधिका-यांवर होणा-या कारवाईकडे लक्ष ठेवून असल्याचेही दिसून येत आहे.
या अगोदरच्या पशुवैद्यकीय अधिका-यांनी दिलेला अहवाल आम्ही फेटाळून लावला असुन कारवाई बाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर केला आहे. तसेच कमिटी देखील चौकशी करत असून दोषी पशुवैद्यकीय अधिका-यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल – डाॅक्टर शामराव कदम जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी रायगड.

Be First to Comment