सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆
पनवेल परिसरातून बिबट्याच्या कातडीची तस्करी करणार्या आरोपीला गुन्हे शाखा, कक्ष-2 ने अटक केली आहे. आरोपी कडून बिबट्याची कातडीही जप्त करण्यात आली आहे. वन्यजीव प्राणी संरक्षक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. जितेंद्र खोतू पवार उर्फ संजु असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मुंबई गोवा हायवे रोडवरील खारपाडा टोलनाका जवळील वैश्णवी हॉटेल जवळ एक इसम दुर्मिळ प्रजातीचे नामशेष होत असलेले संरक्षित वन्यजीव टियाची कातडी अनाधिकृतरीत्या जवळ बाळगुन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हेशाखा, कक्ष-2 पनवेल येथे कार्यरत पोलीस हवालदार अनिल पाटील यांना गोपनीय बातमीदारांमार्फत मिळाली.
त्या अनुषंगाने मिळालेल्या बातमीची खातर जमा करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी एक पोलीस पथक तयार करून पंच, वन विभागाचे अधिकारी व छाप्यासाठी लागणार्या साहित्यासह नमूद ठिकाणी रवाना झाले. ज्या ठिकाणी संशयित व्यक्ती येणार होता त्या ठिकाणी सापळा लावण्यात आला होता. काही वेळाने एक इसम त्याचे उजव्या खांदयावर बॅग लटकवुन खारपाडा टोलनाकाकडे येत असताना दिसला. त्याला पाहताच सोबत असलेल्या बातमीदाराने ठरल्या प्रमाणे इशारा केला.
पोलीस पथकाने आरोपीला पळुन जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता बिबट्याची कातडी आढळून आली. याबाबत नवीन पनवेल पोलीस ठाणे येथे वन्यजीव संरक्षण अधिनियम नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीने ही कातडी कोठून आणली, बिट्याला स्वतः मारले की अन्य कोणी ठार केले, या पूर्वी असा प्रकार आरोपीने केला आहे का ? आदी बाबत तपास सुरू आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश काळे यांनी दिली.
Be First to Comment