जप्तीची भिती दाखविणाऱ्या नोटीसा पाठवणाऱ्या पमपाला दिली सुदाम पाटील यांनी तंबी
सिटी बेल ∆ पनवेल ∆
पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयामार्फत व्यापारी सदनिका / गाळा धारकांना कर भरण्यासाठी नोटीसा पाठविण्यात आलेल्या आहेत. व्यापारी सदनिका / गाळा धारकांनी मालमत्ता कर न भरल्यास त्यांच्यावर जप्तीची टांगती तलवार लटकत आहे. सदर मालमत्ता कर पूर्वलक्षी असल्या कारणाने व चुकीच्या करप्रणालीचे प्रकरण न्याय प्रविष्ट विषय असल्याने आपण त्यांच्यावर सक्ती करू नये असा सज्जड इशारा पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त देशमुख यांना त्या स्वरूपाचे निवेदन दिले आहे.
महाविकास आघाडी, सामाजिक संघटना व ९५ गाव संघर्ष समिती यांनी सातत्याने निषेध मोर्चा, धरणे आंदोलने व जनजागृती करून वाढीव मालमत्ता कराबाबत विरोध दर्शविलेला होता. त्या अनुषंगाने आयुक्तांच्या दालनात सर्व पक्षीय ठरलेल्या मिटिंग प्रमाणे हा मालमत्ता कराचा विषय मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या समवेत एक बैठक आयोजित करून तो सोडविण्याच्या दृष्टीने आयुक्त प्रयत्न करणार होते या गोष्टीची या निवेदनातून आठवण करून देण्यात आलेली आहे. मालमत्ता कराबाबत सक्तीची कारवाई आपण करू नये ही विनंती देखील केलेली असून, कारवाई न थांबल्यास पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस व महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. अशी तंबी देखील पनवेल महानगरपालिकेला देण्यात आलेली आहे.
याबाबत अधिक प्रतिक्रिया देताना सुदाम पाटील म्हणाले की आज आम्ही आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनाची त्यांना आठवण करून दिली आहे.केंद्र सरकारच्या कृपेने सामान्य जनता महागाई आणि बेरोजगारी यामुळे अगोदरच पिचलेली आहे. त्यात तुम्ही आणखीन कराचा बोजा लादलात तर ते योग्य होणार नाही. शब्द दिल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत बैठक आयोजित करा अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जा! अशा स्वरूपाची भूमिका आम्ही घेतली आहे.
सुदाम पाटील यांच्या समवेत गेलेल्या शिष्टमंडळामध्ये जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा निर्मलाताई म्हात्रे, प्रवक्ते शशिकांत बांदोडकर, न्याय व विधी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष ऍड अरुण कुंभार, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर मोरे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांची सन्माननीय उपस्थिती होती.
Be First to Comment