सिटी बेल ∆ पनवेल ∆
संत रोहिदास महाराज यांच्या विचाराने पावन झालेला चर्मकार समाजातील चप्पल दुरुस्ती करून रस्त्यावरती बसून ऊन वारा पाऊस यांची जराही परवा न करता आपला उदरनिर्वाह भागवणाऱ्या गटई कामगारांना पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये गटई कामगार परवाना व स्टॉल परवाना अशा प्रकारची शासन मान्य योजना तातडीने लागू करावी यासाठी रायगड भूषण डॉ शिवदास कांबळे माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष यांनी गटई कामगारांच्या शिष्टमंडळासह पनवेल महानगरपालिकेचे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेतली.
यावेळी आयुक्त देशमुख यांनी तातडीने याबाबत कारवाईचे आदेश संबंधितांना देऊन हे धोरण लवकरच राबविण्यात येईल असे आश्वासन दिले. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेमध्ये शासनाच्या नियमानुसार संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार असल्याची मागणी ही आयुक्तांनी मान्य केली.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर, कामोठे, कळंबोली, खांदा कॉलनी, तळोजा, नवीन पनवेल आणि पनवेल शहर यामधील सर्व गटई कामगार बंधू भगिनींना या द्वारे आवाहन आहे की आपण कोणत्याही प्रकारचा सामाजिक समतोल न बिघडवता किंवा ट्रॅफिकला काही त्रास न होता तसेच परिसरामध्ये नागरिकांची सलोख्याचे संबंध ठेवून आपला व्यवसाय आपल्या जागेवरती आपल्या स्टॉलमध्ये अविरतपणे करत राहावे. लवकरच आपल्याला स्टॉल देण्याची कारवाई पनवेल शहर गटई कामगार युनियनच्या वतीने पूर्ण करण्यात येईल.
– डॉ.शिवदास कांबळे
Be First to Comment