Press "Enter" to skip to content

महाड महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाड महोत्सवात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी साधला महाडकरांशी मुक्तसंवाद : काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची प्रमुख उपस्थिती

सिटी बेल ∆ महाड ∆ साहिल रेळेकर ∆

महाड शहराशी माझे जवळचे नाते आहे. कारण रायगडावरील हिरकणी चित्रपटाच्या अनेक आठवणी मला कायम ऊर्जा देत राहतात. एक स्त्री व्यक्तिरेखा प्रमुख भूमिकेत असतानाही चित्रपट सुपरहिट ठरू शकतो याचे ‘हिरकणी’ हे जिवंत उदाहरण आहे. मी अभिनयाचे व नृत्याचे कुठेही धडे घेतले नाहीत. परंतु कलाक्षेत्राचे बाळकडू आईकडूनच मिळाले. यानिमित्ताने सर्व पालकांना सांगू इच्छिते की, अतिउत्साहाच्या भरात येऊन मुलांना अल्पावधीतच फेम मिळावा असा विचार करू नका. तसेच तरुणांनी देखील सोशल मीडियावरच्या फेमची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, हे सारे क्षणिक आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी महाड महोत्सवात आयोजित विशेष मुलाखतीदरम्यान केले.

महाड महोत्सव २०२३ मध्ये सायंकाळी खास महाडकरांच्या आग्रहास्तव अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक आठवणींना सोनाली कुलकर्णी यांनी उजाळा दिला. या क्षेत्राविषयी तरुण पिढीला आकर्षण असल्याने त्यांनी या क्षेत्रात येण्यासाठी काय केले पाहिजे याविषयी मार्गदर्शन करताना महत्वाच्या सूचनाही दिल्या. आजचे मराठी चित्रपट सामाजिक प्रश्नांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम करतात. ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीमुळे प्रेक्षकवर्गाची पाऊले मोठ्या प्रमाणात चित्रपटगृहांकडे वळताना दिसून येत आहे, असेही त्याआवर्जून म्हणाल्या.

यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत म्हणाले की, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम खऱ्या अर्थाने स्व.माणिकराव जगताप यांच्या संकल्पनेतून लोकविकास सामाजिक संस्थेद्वारे महाड महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. यामुळे महिला बचतगट, विविध स्टॉल्स, स्थानिक रोजगार व पर्यटनालाही चालना मिळते.

स्व.माणिकरावांच्या विचारांचा व समाजसेवेचा वारसा नगराध्यक्षा स्नेहल जगताप, नाना जगताप, श्रीयश जगताप व संपूर्ण जगताप कुटुंबियांसह त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते समर्थपणे चालवित आहेत हे अतिशय कौतुकास्पद आहे.

याप्रसंगी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत, लोकविकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हनुमान (नाना) जगताप, जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अखलाख शिलोत्री, मच्छिमार नेते मार्तंड नाखवा, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस धनंजय देशमुख, तालुकाध्यक्ष राजू कोरपे, शहराध्यक्ष सुदेश कळमकर, अनंत देशमुख, युवानेते श्रीयश जगताप, श्रीधर सकपाळ, अपर्णा येरुणकर, प्रीती कालगुडे, अस्मिता शिंदे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.