Press "Enter" to skip to content

२० कोटीपेक्षा अधिक कर्जवितरण

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने १००० पेक्षा जास्त लघुउद्योगांना कर्जवाटप

सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆

कोविड काळामध्ये लहान मोठ्या उद्योगांवर आलेल्या संकटामुळे अनेक उद्योगधंदे बंद झाले तर दुसर्‍या बाजूला अनेक कंपन्यांनी कामगार कपातीचे धोरण आखले. यामुळे रोजगाराच्या नवीन वाटा म्हणून मागील २ वर्षामध्ये रायगड जिल्ह्यात नवनवीन लघुउद्योग उभे राहत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातील उद्योगांना आर्थिक भांडवल म्हणून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तारणहार म्हणून महत्वाची भूमिका बजावली आहे, कारण नुकतेच बँकेने या लघूद्योगांना केलेल्या कर्जपुरवठाचे आकडे जाहीर करत कळविले की बँकेने तब्बल १००० पेक्षा अधिक लघुउद्योगांना सुमारे २० कोटीपेक्षा अधिक कर्जवितरण केलेले आहे.

विशेष म्हणजे बँकेने हे काम केवळ तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण केलेले आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करण्यामध्ये सदैव अव्वल असणार्‍या रायगड जिल्हा सहकारी बँकेचा हा लघूद्योगांना भांडवल देण्याची योजना देखील तितकीच लोकप्रिय झालेली पाहायला मिळत आहे.

सप्टेंबर २०२२ मध्ये संपन्न झालेल्या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी याबाबत रायगड जिल्ह्यातील अधिकाधिक लघूद्योगांना आणि विशेषत: शेती आधारित उद्योगांना कर्ज पुरवठा करण्याचा बँकेचा उद्देश असणार आहे याबाबत आपले मत त्यांनी व्यक्त केले होते. त्याप्रमाणे बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने लघुउद्योगांना तत्काळ कर्ज उपलब्ध होईल याबाबत योजना बनविली आणि जिल्ह्याच्या प्रत्येक शाखेत ही योजना सुरू केली. रायगड जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत किमान १ लाख ते कमाल ५ लाखपर्यंत वैयक्तिक कर्ज बँकेकडून घेतले. शिवाय या कर्जदारांना बँकेने नुकतेच सुरू केलेल्या कयू आर कोडचे वाटप सुद्धा केले. ज्यामुळे या सर्वच व्यवसायांना गुगल पे, फोन पे किंवा इतर युपीआय पेमेंट सर्व्हिसेसच्या माध्यमातून बँकिंग प्रवाहामध्ये आणण्यामध्ये बँकेला यश आले.

बँकेने या कर्जवाटपामध्ये दुग्धव्यवसाय, किराणा मालाचे दुकान, गणपती मूर्ती तयार करणे, आंबा लागवड, टुरिझम व्यवसाय, मासेमारी, ब्युटीपार्लर यासह अनेक उद्योगांना बँकेने कर्जपुरवठा केला आहे. बँकेच्या या योजनेमध्ये लोकांचा वाढता उत्साह पाहून बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी याबाबत बँकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी दिलेल्या सेवेबद्दल आभार व्यक्त करून तंत्रज्ञानस्नेही आणि आधुनिक सेवा देत असताना ग्राहकसेवा अधिक सुखकर करण्यासाठी बँक कटिबद्ध असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.