१२ ऑगस्ट रोजी रात्री दिसणार – पर्सिड्स उल्कावर्षाव
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
‘उल्कावर्षाव’ ही अवकाशातील एक विलोभनीय घटना आहे. प्राचीन काळी लोकांना उल्कावर्षावाची भीती वाटत असे. जसजसे विज्ञान प्रगत होत गेले, तसतशी ही भीती कमी होत गेली. आणि आज शिक्षणातील स्पर्धेच्या युगात आज तर आपण उल्कावर्षावाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि पर्सिड्स उल्कावर्षावाची ही संधी १२ऑगस्ट रोजी रात्री दिसणार असल्याची खगोलीयन माहिती खगोल शास्त्रज्ञ विशाल कुंभारे यांनी दिली आहे.
हा पर्सिड्स उल्कावर्षाव १८६२ मध्ये शोधलेल्या धूमकेतू (Swift-Tuttle) स्विफ्ट-टटलने तयार केलेला आहे. ४६.८ टक्के प्रकाशित चंद्र या वर्षी काही उल्का दिसण्यापासून थांबवेल, परंतु पर्सिड्स उल्कावर्षाव इतका तेजस्वी असतो त्यामुळे बऱ्याचश्या उल्का आपण पाहू शकतो.
तसेच पुण्याहून, १२ ऑगस्टच्या रात्री जेव्हा उल्कावर्षावाचा तेजस्वी बिंदू आपल्या पूर्व क्षितिजाच्या वर जाईल म्हणजे रात्री १०:१० मिनिटांनंतर ते १३ ऑगस्टच्या पहाटे ०५:५३ पर्यंत उल्कावर्षाव पाहू शकतो. असे ग्लोबल मिशन अॅस्ट्रोनोमी अँड रिसर्च सेंटर चे अध्यक्ष व खगोलशास्त्रज्ञ विशाल कुंभारे यांनी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देत या विषयी थोडक्यात गणितीय मांडणी केली तर लक्षात येते की,पुण्याहून उल्कावर्षाव क्षितिजाच्या ५१अंश वर दिसेल आणि त्या आधारावर खगोलीयन अंदाज आहे की पुणे शहरातून ताशी ६०-८० उल्का पाहू शकणार असल्याचे यात म्हटले आहे .
उल्कावर्षाव कसा होतो ?
उल्कावर्षाव हा धूमकेतूमुळे तयार होतो. जेव्हा धूमकेतू सूर्यप्रदक्षिणा करून जातो, तेव्हा तो आपल्या मागे वायू आणि धूळ सोडत जातो. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा करताना या धुळीच्या मार्गातून जाते तेव्हा ही धूळ खडक, धातू, वायू, बर्फ इत्यादी पृथ्वीच्या गुरुत्वामुळे आकर्षित होऊन जमिनीकडे खेचली जाते. या उल्का सरासरी ताशी ५० हजार किमीच्या गतीने वातावरणातून प्रवेश करतात. पृथ्वीच्या वातावरणात आल्यानंतर हे खडक घर्षणामुळे जळायला सुरुवात होते आणि उल्कावर्षावाचे सुंदर दृश्य आपल्याला पहायला मिळते. उल्कावर्षावाला ‘शूटिंग स्टार’ असेही म्हणतात. बहुतेक उल्का या आकाशात जळून जातात. मोठ्या असल्यास त्या जमिनीवर पडण्याची भीती असते.
ऑगस्ट महिन्यात प्रामुख्याने ‘पर्सिड्स’ हा प्रसिद्ध उल्कावर्षाव दिसतो. हा उल्कावर्षाव दरवर्षी १७ जुलै ते २४ ऑगस्ट या दरम्यान दिसत असला तरी सर्वाधिक उल्का म्हणजे जवळपास ६० ते १५० उल्का प्रती तास या वर्षी १२ ऑगस्टच्या मध्यरात्री आणि १३ ऑगस्टच्या पहाटेपर्यंत पर्सियस नक्षत्रात पाहात येणार आहेत, असे संकेत दिले आहेत. हा उल्कावर्षाव १२-१३ ऑगस्टला भरपूर दिसत असला, तरी संपूर्ण महिनाभर आपण कमी-जास्त प्रमाणात तो पाहू शकतो. असा विश्वास आणि खगोल माहिती विशाल कुंभारे यांनी दिली आहे .
उल्कावर्षावांनी मानवांना नेहमीच भुरळ घातली आहे. वेगवेगळ्या ऋतुंमध्ये होणारे एटा एक्वेरिड, लायरीड, पर्सिड्स आणि जेमिनैड्स सारखे अनेक प्रकारचे उल्का वर्षाव आहेत.परंतु सहसा जुलै ते ऑगस्ट दरम्यान आढळणारा उल्कावर्षाव हा पर्सिड्स उल्कावर्षाव असतो. पर्सीस नक्षत्रातून हा उल्कावर्षाव होतो म्हणून याला पर्सिड्स उल्कावर्षाव असे म्हंटले जाते. खगोलशास्त्रज्ञ आणि अवकाश निरीक्षक एका अंधाऱ्या ठिकाणाहून एका तासात ६० ते १५० उल्का पहायला मिळतात म्हणून उत्सुकतेने या उल्कावर्षावाची प्रतीक्षा करतात.
वर्षभरात तीन मोठे उल्कावर्षाव होतात. यापैकी पहिला उल्कावर्षाव हा जानेवारी महिन्यात, दुसरा उल्कावर्षाव ऑगस्ट महिन्यात तर तिसरा डिसेंबर महिन्यात पहायला मिळतो.
उल्का दिसणे ही जितकी सुंदर बाब आहे, तितकेच उल्का निरीक्षण करणे अवघड आहे. एका दिशेने पाहिल्यास उल्का दिसत नाहीत. उभे राहून उल्का पाहणे कठीण असल्याचे सांगितले आहे . पर्सिड्स उल्कावर्षाव कसा पाहावा?
उल्कावर्षाव पाहण्यासाठी आपल्याला कोणत्याही विशेष उपकरणांची किंवा बर्याच कौशल्यांची आवश्यकता नाही. उल्का पाहण्यास दुर्बीण वापरता येत नाही. द्विनेत्री (Binocular) पण तितकी सोयीची नाही. उल्का निरीक्षण केवळ साध्या (उघड्या ) डोळ्याने सोयीचे आहे. आपल्याला आवश्यक आहे स्पष्ट आकाश, बरेचसे धैर्य आणि उल्कावर्षाव अवकाश नकाशा.
पुढील टिप्स आपला उल्कावर्षाव (शूटिंग स्टार) पाहण्याचा आनंद वाढविण्यास मदत करू शकतात.
शहरातून उल्का निरीक्षण करण्यासाठी उंच इमारतीच्या वर जिथून चारही दिशेने क्षितिज दिसेल अशा ठिकाणी जावे.
उल्कावर्षाव स्पष्टपणे पाहण्यासाठी शहरापासून दूर गडद अंधार असलेले ठिकाण शोधा. त्या ठिकाणी गेल्यानंतर, डोळ्यांची दृष्टी स्पष्ट होण्यास 15 ते 20 मिनिटे लागू शकतात. हवामानानुसार वेषभूषा करा, विशेषत: जर आपण जास्त काळ उल्कावर्षाव पाहण्याची योजना आखत असाल तर, सोबत ब्लँकेट किंवा आरामदायक खुर्ची ठेवा. व्यवस्थित नियोजन झाले कि पाठीवर झोपा किंवा आरामदायक खुर्चीवरती बसा आणि उल्कावर्षाव अवकाश नकाशा काढा. योग्य दिशेने निरीक्षण करत उल्कावर्षावाचा मनसोक्त आनंद घ्या.
सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण आहे, तरीही संधी मिळेल तशी या उल्कावर्षावाचा प्रत्येकाने आनंद घ्या, असे आवाहन खगोल शास्त्रज्ञ विशाल कुंभारे यांनी केले.
Be First to Comment